(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut Bail Plea Hearing : ठाकरेंची तोफ तुरुंगाबाहेर येणार? संजय राऊतांच्या जामीनावर आज फैसला
MP Sanjay Raut Bail Hearing : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam) अटकेत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात (Bombay Sessions Court) सुनावणी पार पडणार आहे. गेल्या सुनावणीवेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. यावरच आज सुनावणी होणार असून आज न्यायालय आपला फैसला सुनावणार आहे. दरम्यान, तपासयंत्रणेचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर, संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीनं (ED) केला आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत न्यायालय काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी 9 नोव्हेंबरला कोर्ट निर्णय देणार आहे.