(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray PC : सर्व गोष्टी सुरु, मग सणांवरच का येता?' राज ठाकरे यांचा सरकारला सवाल ABP Majha
मुंबई : सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. असं असतानाही दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.मुंबईत काही ठिकाणी मनसेनं दहीहंडी फोडल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लॉकडाऊन आवडे सरकारला म्हणत सर्व गोष्टी सुरु आहेत, मग सणांवरच का येता? असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला केला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, जन आशीर्वाद यात्रा झालेली चालली. सण आला की लॉकडाऊन. म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांच्या यात्रे, मेळाव्यांमधून नाही. यांना जे हवंय तेवढं वापरायचं आणि बाकीचं बंद करुन इतर जनतेला घाबरून ठेवायंच. त्यामुळे मी उत्सव साजरा करा असे सांगितले, असं राज ठाकरे म्हणाले.
ते म्हणाले की, पहिली, दुसरी तिसरी लाट मुद्दाम आणली जात आहे. यांच्या हाणामाऱ्या सुरु आहेत. भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केला. यांच्यासाठी मंदिरे उघडी आहेत बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी वाटेल त्या गोष्टी करायच्या आम्ही दहीहांडी साजरी करायची नाही. माननीय बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावरती बिल्डरांच्या गाड्या येणं काही कमी झालेल्या दिसत नाहीत. सरकारकडून कामे करुन घेण्यासाठी येणाऱ्यांच्या गाड्या कमी झालेल्या दिसत नाहीत. कुठेच काही कमी झालेलं नाही तर या सणांवरच तुम्ही कसे काय येता? त्यामुळे मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना जोरात दहीहंडी उत्सव साजरा करा जे होईल ते होईल असं सांगितलं होतं, असंही राज ठाकरे म्हणाले.
मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या संदर्भात विचारल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, अस्वलाच्या अंगावर केस किती आहेत हे अस्वल किती मोजत नाही. त्याप्रमाणे आमच्या अंगावर केसेस आहेत. हे सर्व सुडबुद्धीने सुरु आहे, असं ठाकरे म्हणाले.