Yavatmal : उमरखेडच्या दहागावजवळ ST वाहून गेली, प्रवासी अडकले, बचावकार्य सुरु
यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड इथल्या दहागावजवळ एसटी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या एसटीमध्ये चार ते सहा प्रवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. ही एसटी उमरखेडवरून पुसदला जात होती. रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे दहागावच्या पुलावर पाणी आलं होतं. असं असतानाही एसटी ड्रायव्हरने नको ते धाडस करुन बस पाण्यातून रेटली आणि अपघाताची ही घटना घडली.
सध्या स्थानिकांकडून बचाव कार्य सुरु आहे. या बसमधील प्रवासी, कडेंक्टर आणि ड्रायव्हर यांनी आता टपाचा आधार घेतला असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
ही बस उमरखेडवरून पुसदला जात होती. घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली असून बचाव पथकाने शोधमोहीम सुरु केली आहे. पुलावर पाणी असल्यास वाहतूक करु नये असं सातत्याने आवाहन करण्यात येत असलं तरी या एसटी चालकाने अती धाडस करुन ही एसटी पाण्यात घातली आणि हा अपघात घडला. नाल्याच्या दोन्ही दिशेला पाणी असताना एसटी चालकाने हा प्रताप केला.