Larry Ellison : एलन मस्कला पिछाडीवर टाकणारा जगातील दुसरा श्रीमंत व्यक्ती 95 टक्के संपत्ती दान करणार, लॅरी एलिसन यांची नेटवर्थ किती?
Larry Ellison : जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन यांनी 2010 मध्ये एक संकल्प केला होता. त्यानुसार ते त्यांच्या एकूण संपत्तीपैकी 95 टक्के संपत्ती दान करणार आहेत.

नवी दिल्ली : अब्जाधीश लॅरी एलिसन (Larry Ellison ) काही दिवसांपूर्वी काही कालावधीसाठी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांना पिछाडीवर टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचले होते. सध्या एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून लॅरी एलिसन दुसऱ्या स्थानावर आहेत. लॅरी एलिसन त्यांच्या एकूण संपत्तीच्या 95 टक्के संपत्ती दान करण्याचा निर्णय 2010 मध्ये घेतला होता. आता ते त्यांच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नियोजन करत आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार त्यांची नेटवर्थ 368 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
Larry Ellison : लॅरी एलिसन किती संपत्ती दान करणार?
फॉर्च्यूनच्या रिपोर्टनुसार, लॅरी एलिसन यांनी 2010 मध्ये केलेल्या एका संकल्पानुसार 95 टक्के संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या लॅरी एलिसन श्रीमंतांच्या यादीत टॉपवर पोहोचल्यानंतर संपत्ती दान करण्यासंदर्भात योजना तयार करत आहेत. एलिसन त्यांच्या अटीवर संपत्ती दान करण्याचा पर्याय निवडत आहेत. लॅरी एलिसन यांच्याकडून दिलं जाणारं दान ऑक्सफोर्ड यूनिवर्सीटीमध्ये असलेल्या एलिसन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीकडून संचलित केलं जातं. ही संस्था आरोग्य सेवा, अन्न संकट, जलवायू परिवर्तन, एआय संशोधन याबाबतच्या जागतिक आव्हानांवर काम करते.
लॅरी एलिसन यांनी यापूर्वी अनेकदा मोठं दान केलं आहे. संशोधन केंद्र आणि उपचार केंद्रांच्या स्थापनेसाठी मोठी रक्कम दान केली होती. कॅन्सर रिसर्च सेंटरसाठी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाला 200 दशलक्ष डॉलर्स दिले आहेत. एलिसन मेडिकल फाउंडेशनला 1 अब्ज डॉलर्सचं दान दिलं होते. तै वैद्यकीय संशोधनाशी संबंधित होतं. ऑक्सफोर्ड एलिसन इन्स्टिट्यूटसाठी1.3 अब्ज डॉलर्स दिले आहेत. जे 2027 पासून सुरु होणार आहे. जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन सातत्यानं संकेत देत आहेत की त्यांची जवळपास 95 टक्के संपत्ती लोकांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या अटीवर आणि निश्चित वेळापत्रकानुसार खर्च केली जाईल.
लॅरी एलिसन हे गेल्या अनेक दिवसांपासून अब्जाधीशांच्या यादीत आहेत. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या संपत्तीमध्ये 101 अब्ज डॉलर्सची वाढ एकाच दिवसात झाल्यानं ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. लॅरी एलिसन यांची नेटवर्थ 393 अब्ज डॉलर्सवर गेली होती. त्या दिवशी त्यांनी एलन मस्क यांना (385 अब्ज डॉलर्स) मागं टाकलं होतं. मात्र, एलन मस्क पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर पोहोचले होते.
ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार लॅरी एलिसन 2025 मध्ये सर्वाधिक कमाई करणारे अब्जाधीश ठरले आहेत. लॅरी एलिसन यांच्याकडे ओरॅकलमधील 41 टक्के भागीदारी आहे. लॅरी एलिसन यांचं वय सध्या 81 वर्ष आहे.
























