Dussehra Melava : भगवान भक्तीगडावर होणाऱ्या यंदाच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय काय बोलणार?
Pankaja Munde on Dasara Melava : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर होणार आहे. प्रशासनानं नियम आणि अटींसह या मेळाव्याला परवानगी दिली आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या संघर्ष यश-अपयश या संदर्भात मी दसरा मेळाव्यात बोलणार असल्याचे पंकजा मुंडे सांगत आहेत. या संदर्भात त्यांनी एक व्हिडीओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन जारी केला आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, आपण सर्वजण उद्याच्या कार्यक्रमासाठी उत्सुक आहोत. दोन वर्षात खूप गोष्टी मनात साचल्या आहेत. तुमचंही ऐकायचं आहे, मलाही बोलायचं आहे. या दोन वर्षात अनेक घटना घडल्या. या दोन वर्षात मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत, अनेक संघर्ष, अनेक यश-अपयश याची सर्व कहाणी. तिथून आपण कोणती उमेद घ्यायची आणि भविष्याचा प्रवास कसा करायचा हा भाषणाचा सूर असेल. मी काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष आहे, माझंही लक्ष आहे, कारण मी जे काही बोलते ते स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने बोलते. भगवान बाबांच्या आशिर्वादाने आणि मुंडे साहेबांच्या संस्कारावर आधारीत बोलते. त्यामुळं आपण कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाला उपस्थित राहावं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.