(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi Pune Court:सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य, राहुल गांधींना हजर राहा, पुणे कोर्टाचे आदेश
Rahul Gandhi Pune Court:सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य, राहुल गांधींना हजर राहा, पुणे कोर्टाचे आदेश
राहुल गांधी यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज, सोमवारी पुणे न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज, सोमवारी पुणे न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. या आदेशाच्या पूर्ततेसाठी राहुल गांधी न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडणार का, याविषयी उत्सुकता आहे. मात्र, ‘समन्स’ मिळाल्यानंतरही ते गैरहजर राहिल्यास त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट निघू शकते, असे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर विश्रामबाग पोलिसांनी तपासणी अहवाल सादर केला असून, तक्रारीत तथ्य आढळून आल्याने न्यायालयाने राहुल गांधी यांना हजर होण्याचा आदेश दिला आहे. गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या ‘कलम २०२’नुसार सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिला होता. याची पूर्तता न केल्याने पोलिसांना नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर पोलिसांनी तपासणी अहवाल सादर केला. त्यामध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी १९ ऑगस्टला न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडावे, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिला आहे.