Sharad pawar Birthday : शरद पवारांचा 84 वा वाढदिवस, पुतणे अजित पवारांकडून काकांना खास शुभेच्छा, आज दिल्लीत भेट होणार?
Sharad pawar Birthday : माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे.
मुंबई : आज (दि. 12) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस (Sharad Pawar Birthday) आहे. शरद पवार यांच्या 84 वाढदिवसानिमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवारांनी 85 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त शरद पवार यांच्या पक्षाच्या 'एक्स' हँडलवर एक खास ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमधून शरद पवारांच्या जीवनातील खास प्रसंग दाखवण्यात आले आहे. तर त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
अजित पवार यांनी 2023 साली शरद पवार यांची साथ सोडत भाजपसोबत सरकार स्थापन केले. पक्षाचे दिग्गज नेते अजित पवारांसोबत गेले. 40 आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली. यानंतर शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह हिरावलं गेलं. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात सामना रंगला. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र विधानसभेत अजित पवारांनी बाजी मारली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबात दुरावा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. pic.twitter.com/6SnkF97upb
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 12, 2024
पुतण्याकडून-काकांना खास शुभेच्छा
आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त 'एक्स'वर शुभेच्छा दिल्या आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा, असे त्यांनी म्हटले आहे. तर आज अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही दिल्ली मध्ये आहेत. शरद पवारांच्या वाढदिवशी काका-पुतण्याची भेट होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्ली येथे रवाना झाले आहेत.
गेली ६ दशकं ज्या धोरणी नेत्याच्या सर्वसमावेशक आणि दूरदृष्टीने आपल्या राष्ट्राला-महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेलं त्या आदरणीय पवारसाहेबांचं अभिष्टचिंतन करूया #UntoldStoriesOfPawarSaheb ह्या गौरवकथांच्या माध्यमातून !#पवारसाहेब_शतायुषी_व्हा #VisionaryPawarSaheb pic.twitter.com/hgaEl2uQvu
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 12, 2024
दरम्यान, आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार पक्षाच्या एक्स हँडलवर एक खास ट्विट करण्यात आले आहे. आज दिवसभर शरद पवारांच्या आयुष्यातील माहिती नसलेले क्षण ट्विट केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
आणखी वाचा