Pune Hit and run : अपघातानंतर फरार झालेल्या आरोपीला सीसीटीव्हीद्वारे शोधलं
Pune Hit and run : अपघातानंतर फरार झालेल्या आरोपीला सीसीटीव्हीद्वारे शोधलं
पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. कोरेगाव पार्क परिसरात गुगल बिल्डिंगसमोर भरधाव आलिशान कारने दोन दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना समोर आली आहे, यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मध्यरात्री 01.30 ते 1.35 वाजण्याच्या सुमारास एबीसी रोडकडून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलिशान कारने MH12 NE 4464 पहिल्यांदा एक्टिवावरील तिघांना धडक दिली.या घटनेमध्ये ते तिघे किरकोळ जखमी झाले. त्यानंतर पुढे एक्सेस गाडीवरून जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने चालक रौफ अकबर शेख गंभीर जखमी झाले. त्यानंतर जखमी अवस्थेत त्यांना नोबल हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक दारुच्या नशेत असल्याची प्रथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींग समोर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघात झाल्यावर चालक भरधाव वेगात कार घेऊन पळून गेला. या अपघातात रौफ अकबर शेख या दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाला आहे. या आलिशान कारच्या चालकाने २ दुचाकींना धडक दिली यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत.
तर अपघात करणारा कारचालक या घटनांनंतर फरार झाला होता. अपघात झालेल्या परिसरातील सीसीटिव्हीच्या माध्यमातून कारचा नंबर काढण्यात आला, त्यानंतर त्या कारचालकाचा मोबाईल नंबर काढून त्यावरून पत्ता मिळवण्यात आला आहे. या अपघाच प्रकरणातील कारचालकाचे नाव आयुष प्रदीप तयाल (वय 34 वर्षे रा. हडपसर) याला पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.