(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Balasaheb Sanap | माजी आमदार बाळासाहेब सानप यांची घरवापसी; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
नाशिकमधील नेते आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांची अखेर घरवापसी झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या भाजप कार्यालयात त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
भाजपमध्ये काम करताना अनेक कार्यकर्ते जोडले. पक्ष मोठा करण्यासाठी प्रयत्न केला. मधल्या काळात थोडासा दुरावा झाला पण संघ आणि भाजपचं काम केलेला माणूस दुसरीकडे रमू शकत नाही म्हणून पुन्हा भाजपात प्रवेश करत आहे. येत्या काळात नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपकडून जास्तीत जास्त काम करेन," अशा शब्दात बाळासाहेब सानप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बाळासाहेब सानप भाजप पुन्हा प्रवेश करतात याचा आनंद आहे. समज-गैरसमज तयार झाले आणि त्यातून अंतर निर्माण झालं, त्यामुळे ते काही काळ आमच्यामध्ये नव्हते पण मनाने ते आमच्यामध्ये होते. भाजप माझा पक्ष आणि माझं जीवन इथेच घालवायचा आहे, असं बाळासाहेब सानप यांनी मला सांगितलं. त्यासाठी कुठलंही निगोसिएशन करावं लागलं नाही, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. "कुंभमेळ्याच्या वेळी गिरीश महाजन यांच्या मदतीला बाळासाहेब धावून आले आणि त्यांनी सर्व अडचणी दूर करुन काम केलं. बाळासाहेब आल्यामुळे भाजपमध्ये नवचैतन्य येईल. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलीही अडचण येणार नाही," असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, "नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. येत्या काळात भाजपचा खासदारही तिथे निवडून येईल."