कोण आहेत हे निर्दयी पालक? दोन महिन्याच्या चिमुरडीला दर्ग्यात सोडलं, आई-वडिलांचा शोध सुरू
पुण्याच्या चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका दर्ग्यात दोन महिन्याच्या चिमुरडीला आईवडिलांनीच उघड्यावर सोडल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे. चंदनगर पोलीस स्टेशनच्या दामिनी मार्शलने या चिमुरडीला ताब्यात घेत तिची शुश्रूषा केली. चंदन नगर पोलीस या चिमुरडीच्या आई-वडिलांचा शोध घेत आहे.
काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास खराडीतील एका दर्ग्यात दोन महिन्यांच्या चिमुरडीला तिच्या आई-वडिलांनी सोडून दिल्याची माहिती चंदन नगर पोलीस ठाण्यातील एलआयबीचे कर्मचारी पांडुरंग नानेकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती दामिनी पथकाला दिली. त्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर दामिनी मार्शल उज्ज्वला बनकर आणि सुवर्णा वाळके यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेउन बाळाला ताब्यात घेतलं. त्यांनी बाळाला पोलीस ठाण्यात आणून शुश्रूषा केली. त्यानंतर दूध पाजून दोन महिन्यांच्या चिमुरडीला आपलेसे केले. ही कामगिरी पांडुरंग नाणेकर, समीर शेख, संदीप पाटील यांच्या पथकाने केली.