नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Nashik Raigad Guardian Minister : गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Nashik Raigad Guardian Minister : राज्य सरकारकडून दि. 18 जानेवारीला सर्व पालकमंत्र्यांची यादी (Guardian Minister List) जाहीर करण्यात आली होती. यात नाशिकमधून भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि रायगडमधून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यानंतर नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे (Dada Bhuse) आणि रायगडमधून भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केल्याने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दावोस दौऱ्यामुळे पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर पडल्याचे बोलले जात होते. मात्र, मुख्यमंत्री दावोसहून परतल्यानंतरही महायुतीत पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असल्याचे दिसून येत आहे. आता पालकमंत्रीपदाचा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकाच व्यासपीठावर आले आहेत. विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात तिन्ही नेते उपस्थित आहेत. कोस्टल रोडच्या उद्घाटनानंतर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र आले आहेत. त्यामुळे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा आज सुटणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी दिल्ली वारी?
शिवसेनेला सहपालकमंत्रिपदाचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव शिवसेनेला अमान्य आहे. त्यामुळे पालक मंत्री आणि सह पालकमंत्रिपद याविषयी महायुतीला तोडगा काढावा लागणार आहे. आज व्यासपीठावर तिन्ही नेते एकत्रित येत आहेत. मात्र, आज पालकमंत्रिपदाचा तिढा आज सुटण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण तिन्ही नेत्यांना एकमेकांशी चर्चा करावी लागणार आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी दिल्लीची वारी देखील करावी लागू शकते किंवा दिल्लीवरून काही आदेश येऊ शकतात. त्यानंतरच पालकमंत्रिपदावर तोडगा निघू शकतो.
पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबला
कारण एका बाजूला अजित पवार हे ठाम आहेत तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे ही ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवसात पालकमंत्रिपदाबाबत पहिली बैठक होऊ शकते. यात एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक पार पडून तिने नेते आपापले म्हणणे एकमेकांसमोर मांडतील. तसेच आणखी काही बैठका होण्याची देखील शक्यता असल्याने पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच पालकमंत्रिपदाचा निर्णय होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
