Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
Santosh Deshmukh Case : सुदर्शन घुलेला शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिकद्वारे बीड येथील मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले.

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी सुनावण्यात आली होती. आज शुक्रवारी (दि. 31) सुदर्शन घुलेची कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात (Court) व्हीसीद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयाने सुदर्शन घुले याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे.
सुदर्शन घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले हा गुजरातला पळून गेला होता. त्याच्याकडील पैसे संपल्यानंतर तो आपल्या एका साथीदारांसह पैसे घेण्यासाठी पुण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी सापळा रचून सुदर्शन घुलेला अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर विविध तपास यंत्रणांकडून त्याचा तपास सुरू असून सीआयडी आणि एसआयटीसह बीड गुन्हे शाखेने सुदर्शन घुलेची याआधी चौकशी केली आहे.
सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सुदर्शन घुलेला याआधी पाच दिवसाची एसआयटी कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची एसआयटी कोठडी आज संपली. यानंतर त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिकद्वारे बीड येथील मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी आरोपीच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने सुदर्शन घुले याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र या प्रकरणात केव्हाही पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार तपास यंत्रणेला असणार आहे.
कोण आहे सुदर्शन घुले?
सुदर्शन घुले हा बीडमधील केजचा टाकळी गावचा रहिवाशी आहे. सुदर्शन घुले 27 वर्षांचा आहे. सुदर्शनचे इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या सुदर्शन हा ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. तसेच उचल घेऊन कामाला न आलेल्या मजूरांकडून सुदर्शन वसुली देखील करायचा. सुदर्शनवर 10 वर्षांत 10 गुन्हे दाखल आहेत. तर कृष्णा आंधळेवर 4 वर्षांमध्ये 6 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड याचा खास असलेल्या विष्णू चाटे याच्यासोबत त्याची ओळख झाली. त्यातून त्याला काही कामं मिळाली. राजकीय नेते, पक्षाचे काम करणे, व्यवहार सांभाळणे अशा कामात तो तरबेज असल्याचे माहिती समोर आली आहे.
कृष्णा आंधळे अजूनही फरार
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले महेश केदार, सुधीर सांगळेला अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंगळे हा अद्याप फरार आहे. तर या हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
