(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ballia Firing Case | यूपीच्या बलियात पोलीस अधिकाऱ्यांसमोर गोळीबार; आरोपी फरार, योगी सरकारवर टीका
उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकार बलिया गोळीबार कांडामुळं विरोधी पक्षाच्या निशाण्यावर आहे. पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या समोर गोळीबार करत हत्या केल्याची घटना झाल्यानंतर योगी सरकारवर आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या प्रकरणावरुन उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान या प्रकरणी मुख्य आरोपी धिरेंद्र सिंह हा अद्याप फरार असून त्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे.
बलियातील दुर्जनपूरमध्ये रेशन दुकानांच्या वाटपासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीदरम्यान सदस्यांमध्ये असलेल्या वादामुळे अधिकाऱ्यांनी बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचवेळी वाद निर्माण झाला आणि भाजप कार्यकर्ता धिरेंद्र सिंह याने जयप्रकाश यांची गोळ्या घालून हत्या केली. धिरेंद्र सिंह हा भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांचे निकटवर्तीय आहेत, असं म्हटलं आहे. गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ सुरु झाली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाच सेकंदाच्या या व्हिडीओत तीन वेळा गोळीबार झाल्यानंतर लोक घाबरुन पळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी पोलिस अधिकाऱ्यांसह प्रशासनातील बडे अधिकारी देखील उपस्थित आहेत.
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे की, एनकांउटरवालं हे सरकार आता आपल्या लोकांची गाडी पलटी करेल का?. तर बसपा अध्यक्षा मायावती यांनी उत्तरप्रदेशातील कायदा व्यवस्था संपुष्टात आली आहे, असं म्हटलंय. तर काँग्रेसनं योगी सरकारव आपल्या लोकांना वाचवत असल्याचा आरोप केलाय. या प्रकरणात गोळी चालवणारा व्यक्ती भाजपचा नेता असल्याचं बोललं जात आहे. यावरुन सर्व विरोधी पक्षांनी भाजप सरकारला घेरलं आहे.