(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Manda Mhatre Hattrick In Belapur : सहा वेळा आमदार राहिलेल्या गणेश नाईकांना सलग विजयाची हॅट्रिक करण्यात अपयश आलं. मात्र ही परंपरा मोडीत काढत महिला आमदार मंदा म्हात्रे यांनी ती किमया साधली.
नवी मुंबई : बेलापूर विधानसभेत विजयाची हॅट्रिक करण्यात आतापर्यंत कोणत्याही नेत्याला यश आलेले नव्हते. मात्र ही परंपरा महिला आमदार मंदा म्हात्रे यांनी मोडीत काढली आहे. 2014, 2019 आणि 2024 या निवडणुकीत सलग विजय मिळवत मंदा म्हात्रे यांनी हॅट्रिक करण्याची किमया केली आहे. हे करताना बेलापूर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून प्रस्तापित केला आहे.
बेलापूर मतदारसंघाचे आमदार म्हणून सर्वात जास्त वेळा गणेश नाईक यांनी प्रतिनिधित्व केले आहे. एकूण सहा वेळा आमदार राहिलेल्या गणेश नाईक यांनाही विजयाची हॅट्रिक करण्यात अपयश आलेले आहे. 1990 मध्ये पहिल्यांदा गणेश नाईक शिवसेनेकडून बेलापूर विधानसभेत आमदार झाले. तेव्हा ठाणे, मिरा भाईंदरचा परिसरही या विधानसभेत समाविष्ठ होता. त्यानंतर परत 1995 ला गणेश नाईक यांनी दुसऱ्यांदा विजय संपादन केला. मात्र शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गणेश नाईक यांचा 1999 ला पराभव झाला. त्यावेळी शिवसेनेचे सिताराम भोईर यांनी गणेश नाईकांचा पराभव करीत हॅट्रिक करण्यापासून रोखले.
पुढे गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत 2004 ला गेलेली आमदारकी खेचून आणली. यानंतर 2009 साली विभाजन झालेल्या बेलापुर मतदारसंघात भाजपाच्या सूरेश हावरे यांचा पराभव करीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. मात्र परत एकदा हॅट्रिकची संधी असताना 2014 साली भाजपाच्या मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांचा पराभव केला आणि ती संधी हिरावून घेतली. मात्र योगायोग असा की त्यांचे पुत्र संदीप नाईक यांना सलग तिसऱ्यांदा निवडणूक न लढवता आल्याने हॅट्रिक करण्याचा योग साधता आला नाही.
नवी मुंबईतील ऐरोली मतदार संघात 2009 आणि 2014 साली संदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार होवूनही 2019 साली तिकिट न मिळाल्याने हॅट्रिकपासून दूर रहावे लागले होते. (2019 ला संदीप नाईकांना भाजपकडून ऐरोली विधानसभेत मिळालेले तिकिट त्यांनी वडील गणेश नाईकांना दिले). गणेश नाईक यांनी 2019 आणि 2024 साली भाजपकडून ऐरोली विधानसभेत सलग विजय मिळवला आहे. मात्र 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत गणेश नाईक यांचे वय 80 च्या घरात जाणार असल्याने निवडणुकीचे तिकिट मिळण्याची शक्यता कमी आहे. असे झाल्यास हॅट्रीक करण्यात तिसऱ्यांदा आलेली संधी वयामुळे जाऊ शकते.
खासदारांचीही हॅट्रिक हुकली
एकीकडे आमदारांना सलग विजयाची हॅट्रीक करता येत नसताना यामध्ये खासदारांचाही समावेश आहे. 2014 आणि 2019 साली शिवसेनेचे राजन विचारे सलग दोन वेळा नवी मुंबईचा समावेश असलेल्या ठाणे लोकसभेतून निवडून आले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांचा पराभव करीत विजयाचा वारू रोखला.
नवी मुंबईचा समावेश असलेल्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात सलग विजयाची हॅट्रिक करण्यात अपयश आलेले आहे. तिसऱ्यांदा भाजपकडून लढणाऱ्या मंदा म्हात्रे यांचा पराभव होत ही परंपरा चालू राहते की काय अशी शंका निर्माण झाली होती. मात्र अटीतटीच्या लढाईत मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईकांचा पराभव करीत हॅट्रिक न होण्याची परंपरा मोडीत काढत सलग तिसऱ्यांदा विजय संपादन केला.