आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होत नाही यात काही आश्चर्य वाटत नाही. राज्यात एवढं मोठ बहुमत असताना एवढा का वेळ लागतोय हे आश्चर्यकारक आहे.
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून राज्यात 237 एवढ्या प्रचंड बहुमतासह महायुतीने सत्ता मिळवली आहे. मात्र, अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा न ठरल्याने शपथविधी लांबणीवर पडला असून 29 नोव्हेंबर रोजी हा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार असून एकनाथ शिंदे व अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले जाणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं असून महाराष्ट्रातील सर्वच खासदार दिल्ली दरबारी आहेत. यंदाच्या निकालावर व मुख्यमंत्रीपदाला होत असलेला उशीर, यावरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी महायुतीला टोला लगावला आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात महायुतीने निवडणूक लढवल्या होत्या, त्यामुळे निवडणुकीतील निकाल हा त्यांचाच करिश्मा असल्याचे सांगत एकनाथ शिंदेंचं कौतुकही केलं आहे. तसेच, सत्तास्थापनेवर बोलताना, आम्ही त्यांच्याजागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो, असेही सुळे यांनी म्हटलं.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होत नाही यात काही आश्चर्य वाटत नाही. राज्यात एवढं मोठ बहुमत असताना एवढा का वेळ लागतोय हे आश्चर्यकारक आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना शब्द दिलं होता की नाही हे त्यांनाच माहीत. पण, 2019 साली देखील उद्धव ठाकरे यांच्याबाबत असंच झालं होतं. उद्धव ठाकरे 2019 ला वारंवार हेच बोलत होते, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजपला डिवचलं आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली, त्याचाच हा करिश्मा होता ना. शिंदे यांना फसवल की नाही हे त्यांनाच विचारलं पाहिजे, शिंदे यांचा चेहरा होता. त्यामुळे हे यश मिळालं हे नाकारता येत नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलंय.
ट्रम्पेट चिन्हावर बोलताना, आंबेगावचं उदाहरण ताज आहे, आता लढत बसण्यात काही अर्थ नाही, आता लढायचं आहे, असेही त्यांनी म्हटलं. तर, मी स्वतः EVM वर 4 वेळा निवडून आले आहे, ठोस पुरावे आले पाहिजेत हे माझं मत आहे. पण ग्राउंडवरुन जी माहिती येतेय ती धक्कादायक आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला हव्यात ही माझी आधी पण मागणी होती. सगळ्यांनी एकत्र येऊन EVM बाबत डेटा एकत्र करुन सरकारकडे जायला हवं. हे असंच राहीलं तर देशात सरकार कधीच बदलणार नाही. आम्ही हरलो हे प्रांजळपणे मान्य आहे, पण ज्या पद्धतीने आमच्या सीट कमी झाल्या हे मान्य होत नाही. आम्ही, तुम्ही फिल्डवर होतो तिथली माहिती वेगळी होती. 4 महिन्यात एवढा बदल कसा हे समजायला मार्ग नाही, असे मत व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनीही निकालावर संशय व्यक्त केला आहे.
आम्ही कामाला लागलो असतो
भाजप आणि शिंदे सेनेला यशवंतराव चव्हाण यांचा आदर करायला काय हरकत आहे?. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर हे दोघेही गेले नाहीत. आम्ही त्यांच्याजागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो, राज्यात एवढे प्रश्न असताना हे शपथ का घेत नाहीत माहीत नाही, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी भाजप महायुतीला लगावला आहे.
हेही वाचा
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर