PUNE : तरुणीकडून आईचं व्हॉट्सअॅप हॅक, प्रेमसंबंध उघडकीस आणून आईच्या प्रियकराचं ब्लॅकमेलिंग
पुणे : पुण्यातील 21 वर्षीय तरुणीने स्वतःच्या आईचं व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक करून एका पुरुषासोबत असणारे प्रेमसंबंध तिने उघडकीस आणले. त्यानंतर आईच्या प्रियकराला ब्लॅकमेल करत त्याच्याकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी सदर तरुणीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
एका व्यक्तीचे स्वतःच्या आईसोबत असलेल्या प्रेमसंबंधाचा पर्दाफाश करण्यासाठी 21 वर्षीय तरुणीने आईचे व्हॉट्सअॅप हॅक केले. त्यातून तिने आई आणि तिच्या प्रियकराचे फोटो, व्हिडीओ मिळवले. हेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याचं धमकावत 15 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. खंडणीतील एक लाख रक्कम स्वीकारताना पोलिसांनी या तरुणीला आणि तिच्या प्रियकराला रंगेहात पकडले आणि दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. मिथुन मोहन गायकवाड (वय 29) आणि एका 21 वर्षीय तरुणीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता आठ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.