Kurla Bus Accident Update : चालकाने मद्यपान केलेलं नाही, बेस्ट महाव्यवस्थापकांचा दावा
मुंबई : कुर्ला एलबीएस मार्गावर झालेल्या अपघात प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. हा अपघात ज्यावेळी झाला त्यावेळी ड्रायव्हर संजय मोरे याने मद्यपान केलं नव्हतं असं बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल दिग्गीकर यांनी सांगितलं. पोलिसांच्य तपासामध्येही अशी काही गोष्ट आढळली नाही. आता या प्रकरणी दोन समित्या स्थापन केल्या असून त्याचा अहवाल येत्या दोन दिवसात सादर केला जाईल अशी माहितीही अनिल दिग्गीकर यांनी दिली.
बेस्ट बसचे महाव्यवस्थापक अनिल दिग्गीकर म्हणाले की, अपघात होताना चालकाने मद्यपान केल होतं अस कुठही निदर्शनास आलं नाही. पोलिसांच्या अहवालात देखील असं काही नमूद नाही. तो नवीन ड्रायव्हर नाही. याआधी देखील त्याने ड्रायव्हिंग केल आहे. चार वर्षे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्याने काम केलं आहे.
Best Committee On Kurla Bus Accident : दोन समिती स्थापन
या प्रकरणी अधिक माहिती देताना अनिल दिग्गीकर म्हणाले की, या अपघाताची चौकशी करण्यासाठी तात्काळ दोन समित्या स्थापन केल्या आहेत. एका समितीमध्ये दोन आरटीओ अधिकारी आणि बेस्ट प्रशासनाचा एक अधिकारी आहे. ही समिती दोन दिवसांत अहवाल सादर करेल. यामधे गाडी सदोष होती की ड्रायव्हरची काही चूक होती याची माहिती ते देतील. दुसरी समिती प्रामुख्याने जखमीच्या आणि मृतांचा नातेवाईकांना क्लेमचे पैसे लवकर मिळावेत यासाठी काम करेल.
दरम्यान, राज्य शासनाने मृतांसाठी 5 लाख रुपये जाहीर केले आहेत. बेस्टकडून दोन लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना देण्यात येणार आहे. तसेच जखमीच्या उपचाराचा पूर्ण खर्च आम्ही करू अशी माहिती अनिल दिग्गीकर यांनी दिली.