विधानसभेचा निकाल, VVPAT मधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा, पत्रक जारी
एकीकडे मारकडवाडी गावात महाविकास आघाडी व महायुती यांच्यात ईव्हीएमच्या मुद्द्यावरून जुंपल्याचे दिसून येते.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर ईव्हीएम (EVM) मशिनवर मोठी शंका उपस्थित होत आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात देखील महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करत, माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावातील बॅलोट पेपरवरील मतदान प्रक्रियेच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. तसेच, येथील आमदार उत्तमराव जानकर यांनी देखील पुन्हा मतदान घेण्याची मग्नक केली आहे. आमचं मत कोणाला पडलं हे कळण्याचा आम्हाला अधिकार आहे, असेही त्यांनी म्हटलं. या वादावर आता निवडणूक आयोगाने (Election commission) स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, VVPAT मशिनमधील मोजणीत कुठेही तफावत नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे, ईव्हीएमच्या आरोपात कसलेली तथ्य नसल्याचं आयोगाने सांगितल्याचं दिसून येतं.
एकीकडे मारकडवाडी गावात महाविकास आघाडी व महायुती यांच्यात ईव्हीएमच्या मुद्द्यावरून जुंपल्याचे दिसून येते. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील मतदानादिनी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत वाढलेल्या मतदानावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले आहे. या चर्चा आणि गोंधळदरम्यान निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेतील VVPAT मशिनबाबत मोठा खुलासा केला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीवेळी भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघ/विधानसभा विभागातून 5 मतदान केंद्रांची निवड करण्यात आली होती. आयोगाने निवडलेल्या या 5 मतदान केंद्रांच्या VVPAT स्लिपची मोजणी करणे अनिवार्य होते. त्यानुसार, येथील VVPAT मशिनची मोजणी करण्यात आली आहे.
23 नोव्हेंबर रोजीच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील निवडलेल्या 5 मतदान केंद्रांची VVPAT स्लिप मोजणी 23/11/2024 रोजी मतमोजणी निरीक्षक/उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर करण्यात आली आहे. त्यानुसार, महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील 1440 VVPAT युनिट्सची स्लिप गणना संबंधित कंट्रोल युनिट डेटासह केली गेली आहे. संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजेच DEOs कडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार VVPAT स्लिपचा काउंट आणि EVM कंट्रोल युनिट काउंटमधील आकडेवारी समसमान आहे. त्यामध्ये, कोणतीही तफावत आढळलेली नाही. त्यामुळे, मतमोजणीच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे व प्रक्रियेचे योग्य पालन करण्यात आले आहे, असे निवडणूक आयोगाने आज स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मारकडवाडी गावाला भेट देऊन महायुतीचे नेते व महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. ईव्हीएमविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांनाविरुद्ध आज महायुतीच्या नेत्यांनीही मारकवाडीत गावात भेट देऊन आंदोलन सुरु केले आहे.
PRESS NOTE@ECISVEEP @SpokespersonECI pic.twitter.com/LyeINzEV00
— ChiefElectoralOffice (@CEO_Maharashtra) December 10, 2024