Zero Hour : जयंत पाटालांवर मोठी जबाबदारी, शरद पवारांची वाळव्याच्या सभेत मोठी घोषणा
Zero Hour : जयंत पाटालांवर मोठी जबाबदारी, शरद पवारांची वाळव्याच्या सभेत मोठी घोषणा
राजकारण हा संयम आणि टायमिंगचा खेळय. तसाच तो सत्ता आणि आकड्यांचाही खेळ. ज्याला कुणाला आकड्याच्या खेळात बाजी मारायची असते, त्याला करेक्ट टायमिंगवर करेक्ट कार्यक्रम करणं तितकंच गरजेचं असतं...
आणि आता करेक्ट कार्यक्रम हा शब्द ऐकला तरी डोळ्यासमोर येतात...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत राजाराम पाटील...
शांत, संयमी अशी ओळख असलेला पश्चिम महाराष्ट्रातील नेता अशी जयंत पाटलांची आपल्याला ओळख. पण गेल्या दीडदोन वर्षांमध्ये त्यांच्या ओळखीमध्ये आणखी एक शब्द समाविष्ट झालाय. तो शब्द म्हणजे निष्ठावंत. कार्यकर्ते असोत की राजकीय नेते... जयंत पाटलांना ते शरद पवारांचा सर्वात निष्ठावंत कार्यकर्ता मानतात. आता त्याला कारणही स्वाभाविक आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेतृत्वाची एक मोठी फळी आपल्यासोबत घेऊन महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत न जाता शरद पवारांचीच साथ देण्याचा निर्णय जयंत पाटलांनी घेतला.
इतकंच नाही तर आणखी एक किस्सा सांगतो. तुम्ही आता एबीपी माझाच्या स्क्रीनवर पाहात असलेली दृश्य दोन मे २०२३ या तारखेची आहेत. स्थळ तुमच्या लक्षात आलंच असेल. ते आहे मुंबईचं यशवंतराव चव्हाण सेंटर. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षाचा अनपेक्षितरित्या राजीनामा दिला. महाराष्ट्रात जणू राजकीय भूकंप व्हावा अशी स्थिती होती. तिथं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. थोरल्या पवारांनी राजीनामा मागे घ्यावा अशा घोषणा सुरु झाल्या. त्यावेळी शरद पवारांच्या शेजारी आज अजित पवारांसोबत असलेल्या सगळ्याच नेत्यांनी गर्दी केली होती.