Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
अनेक वर्षांपासून या मेट्रोची वाट पाहणाऱ्या मुंबई आणि ठाणेकरांसाठी ही बातमी आशा निर्माण करणारी ठरत आहे.

Mumbai: मुंबई - ठाणे रोज अप-डाउन करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहरातील वाहतूक कोंडी, लोकलमधील गर्दी आणि वेळेची बचत या सगळ्या अडचणींवर उतारा ठरणारी मेट्रो लाईन 4 आणि 4A अखेर टप्प्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या मेट्रो प्रकल्पाच्या सुरूवातीबाबत स्पष्ट संकेत दिले असून, 2026 पासून टप्प्याटप्प्याने मेट्रो सेवा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
प्रवास वेळ कमी होणार
मुंबईतील वडाळा, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाण्यातील कासारवडवली, घोडबंदर रोड, गायमुख हा संपूर्ण पट्टा जोडणारी ही मेट्रो मार्गिका प्रवाशांसाठी गेमचेंजर ठरणार आहे. सध्या या मार्गावर रस्ते आणि लोकल रेल्वेवर मोठा ताण असून, मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
तीन टप्प्यात पूर्ण होणार काम
या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे. यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा ठाणे शहरातील आहे. कॅडबरी जंक्शन ते गायमुख असा सुमारे 10.5 किलोमीटरचा मार्ग सर्वात आधी सुरू होण्याची शक्यता असून, हा टप्पा मार्च 2026 पर्यंत प्रवाशांसाठी खुला होऊ शकतो. याच टप्प्यात कासारवडवली ते गायमुख असा मेट्रो लाईन 4A चा विस्तारही समाविष्ट असेल. त्यामुळे घोडबंदर रोडवरून दररोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांत गायमुख ते विक्रोळीतील गांधी नगरदरम्यानचा सुमारे 10 किलोमीटरचा मार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. यामुळे ठाणे आणि मुंबईच्या मध्य उपनगरांमधील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. अखेरीस विक्रोळी ते वडाळा हा शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते दक्षिण मुंबई असा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होईल. संपूर्ण प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे काही कामे रखडल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, आता अडथळे दूर झाल्याने कामाला वेग देण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून या मेट्रोची वाट पाहणाऱ्या मुंबई आणि ठाणेकरांसाठी ही बातमी आशा निर्माण करणारी ठरत आहे.























