Uddhav Thackeray on BMC Zero Hour : ठाकरेंचा आदेश! रणनीती ठरली;मुंबई महापालिकेसाठी मोर्चेबांधणी
तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरुय झीरो अवर...
मंडळी, राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यात भाजपनं १३२ जागांवर झेप घेतली, पण शिंदेंच्या शिवसेनेनंही ५७ जागा जिंकल्या. त्यामुळं ठाकरेंची शिवसेना खडबडून जागी झाली असून, मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पक्षानं मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पण महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीच्या निमित्तानं ठाकरेंची शिवसेना ही हिंदुत्वाची आपली भूमिका पुन्हा प्रखरतेनं मांडण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मातोश्री निवासस्थानी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. मुंबई महापालिकेची निवडणूक आता कधीही लागू शकते, त्यासाठी आताच तयारीला लागा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना दिली.
आश्चर्याची बाब म्हणजे विधानसभा निवडणुकीतल्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीपाठोपाठ माजी नगरसेवकांच्या बैठकीतही स्वबळाचा सूर आळवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढवावी, असा सूर बहुतांश माजी नगरसेवकांनी आळवला असल्याची माहिती आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेत स्वबळाचा सूर आळवला जात असतानाच हिंदुत्वाचा मुद्दाही प्रखरतेनं मांडण्याची भूमिका पक्षानं घेतली आहे. २०२२ सालच्या राजकीय घडामोडीत ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपकडे पाठ फिरवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीची मोट बांधली होती. त्या दोन धर्मनिरपेक्ष पक्षांसोबतच्या आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेचं हिंदुत्व सौम्य झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता.
मग एकसंध शिवसेनेत ऐतिहासिक बंड करणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांकडूनही तोच आरोप सुरु झाला. शिंदेंची शिवसेना अजूनही त्या आरोपावर ठाम आहे. आणि विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता भाजप आणि शिंदेंची शिवसेना राज्यातल्या नागरिकांना आपल्या बाजूनं वळवण्यात यशस्वी ठरल्याचं चित्र आहे.
त्याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा अधिक प्रखरतेनं लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश माजी नगरसेवकांना दिले आहेत. शिवसेना हिंदुत्वासाठी आधीही लढत होती, उद्याही लढेल आणि यापुढेही लढत राहणार असल्याची शाश्वती उद्धव ठाकरेंनी दिली. आपल्या शिवसेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्याचा अपप्रचार विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याला योग्य उत्तर द्या, अशी सूचना उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना केली...
आणि त्यावर आहे आपला आजचा दुसरा प्रश्न.. तोच पाहण्यासाठी जावूयात पोल सेंटरला.