Fadnavis Varsha Bungalow : वर्षा बंगला,काळी जादू अन् टोपलीभर लिंबू Rajkiya Sholey Special Report
देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन दोन महिने होत आले तरी अद्याप त्यांनी वर्षा बंगल्यावर मुक्काम का हलवला नाही, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. केवळ सवाल उपस्थित करून राऊत थांबले नाहीत, तर त्याला काळ्या जादूपासून ते बंगल्याच्या रिनोवेशनपर्यंत अनेक कारणं असल्याच्या चर्चेलाही त्यांनी तोंड फोडलंय. त्यावरून सत्ताधारी आक्रमक झाले असून त्यांनीही राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. वर्षा बंगल्याबाबत नेमकी काय चर्चा रंगलीय, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
मी पुन्हा येईन, अशी २०१९ साली घोषणा देणाऱ्या फडणवीसांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी पाच वर्षं वाट पाहिली..
२०२४ साली फडणवीसांची प्रतीक्षा पूर्ण झाली आणि ते पुन्हा मुख्यमंत्री झाले.
मात्र मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याची प्रतीक्षा मात्र अजून संपलेली नाही.
'पुन्हा' मुख्यमंत्री झालेले फडणवीस 'पुन्हा' वर्षा बंगल्यावर राहायला का बरं जात नाहीत, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.
शिवाय या चर्चेला तडका मिळालाय तो काळ्या जादूचा.
आता काळ्या जादूची आणि जादूटोण्याची चर्चा निघाली, की सगळे जुने अनुभव आणि आठवणी जाग्या होणं, हे ओघानं आलंच.
राऊतांनी काळ्या जादूचा उल्लेख केल्यानंतर शिंदेंच्या नेत्यांनीही वर्षा बंगल्यावर आलेले अनुभव सांगायला सुरुवात केली.
आम्ही काही असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, अशी प्रस्तावना करत एकमेकांना काळ्या जादूचे शिल्पकार ठरवण्याची स्पर्धाच लागली.
काळी जादू खरंच असती, तर काय झालं असतं,हेही शिरसाटांनी सांगून टाकलं.
कोकणचे सुपुत्र असणाऱ्या रामदास कदमांनी तर काळी जादू या विषयावरून टोपलीभर लिंबांची आठवण काढली.
वर्षा बंगल्यावर यापूर्वी एवढं 'लिंबूमाहात्म्य' घडलं होतं, हे यानिमित्तानं पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर आलं.
एकीकडे वर्षा बंगल्यावर डागडुजी सुरु असल्याचं कारणही महायुतीच्या नेत्यांकडून सांगितलं जातंय.
तर दुसरीकडे वर्षा बंगल्यावर पोहोचायला किंवा त्या बंगल्यावरून बाहेर पडायला काळी जादू किती कारणीभूत ठरू शकते, या चर्चेलाही उधाण आलंय.
अर्थात, वर्षावरचा मुक्काम आणि गच्छंती या दोन्ही गोष्टी 'काळ्या जादू'पेक्षा 'महाशक्तीच्या जादू'वर जास्त अवलंबून असल्याचं गेल्या काही दिवसांत दिसून आलंय.
प्रश्न फक्त एवढाच की 'पदाचं' रिनोवेशन होण्याची मोठी प्रक्रिया पार पडल्यानंतर 'बंगल्याच्या' रिनोवेशनची किरकोळ प्रक्रिया कधी पूर्ण होणार..
All Shows

































