एलॉन मस्क यांची मोठी घोषणा; ट्विटर ब्लू सब्स्क्रायबर्ससाठी नवं फिचर, दोन तासांचे व्हिडीओ अपलोड करता येणार
Twitter Blue Features: ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटर ब्लू सब्स्क्रायबर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. मस्क यांनी ट्वीट केलं की, आता दोन तासांचा आठ जीबीपर्यंतचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करता येणार.
Twitter Blue Features: एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) विकत घेतल्यापासून सातत्यानं नवनवीन बदल ते करत आहेत. त्यांनी अनेकदा सांगितलंय की, ट्विटरला तोट्यातून बाहरे काढण्याच्या दृष्टीनं ते प्रत्येक गोष्टीचा विचार करतात. आतापर्यंत त्यांनी ट्विटर युजर्ससाठी अनेक नवे फिचर्सही लॉन्च केले आहेत. याशिवाय कंपनीनं आपल्या अनेक सुविधांचे पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे. युजर्सना त्यांच्या अकाउंटला ब्ल्यू टिक मिळवण्यासाठी शुल्क भरावं लागतं. यासोबतच ब्ल्यू टिक (Twitter Blue) सबस्क्रिप्शन घेणाऱ्या ग्राहकांना ट्विटरकडून इतरही अनेक सुविधा दिल्या जातात. याच युजर्ससाठी आता मस्क नवकोरं फिचर घेऊन आले आहेत. ट्विटर ब्लूचे सदस्यांना आता दोन तासांची व्हिडीओ क्लिप अपलोड करु शकणार आहेत.
एलॉन मस्क यांनी जाहीर केलं आहे की, आता ट्विटर ब्लूचे सदस्य दोन तासांच्या 8 GB पर्यंतच्या व्हिडीओ क्लिप अपलोड करू शकतील. याबाबत त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. एलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केलं की, "ट्विटर ब्लू व्हेरिफाईड सब्सक्रायबर आता दोन तासांचा (8 जीबी) व्हिडीओ अपलोड करू शकतात." म्हणजेच, ही सेवा मिळवण्यासाठी यूजर्सना ट्विटर ब्लूचं सदस्यत्व घ्यावं लागेल. त्यानंतरच ते दोन तासांचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करु शकणार आहेत.
Twitter Blue Verified subscribers can now upload 2 hour videos (8GB)!
— Elon Musk (@elonmusk) May 18, 2023
ट्विटरला मिळाल्या नव्या सीईओ (CEO)
नुकतंच एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या नव्या सीईओंचीही घोषणा केली. त्यांनी लिंडा याकारिनो यांच्याकडे ट्विटरच्या सीईओ पदाची जबाबदारी सोपवली आहे. मायक्रोब्लॉगिंग साईटच्या सीईओ बनल्यानंतर लिंडा यांनी आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये एलॉन मस्क यांचे आभार मानले आहेत. याशिवाय कंपनीनं डायरेक्ट मेसेज फीचर आणलं होतं. याद्वारे यूजर्स आता ट्विटरवर डायरेक्ट मेसेज पाठवू शकतील आणि सर्व मेसेज एन्क्रिप्टेड होतील. म्हणजेच, हे मेसेज कोणीही डीकोड करू शकणार नाही.
एलॉन मस्क काहीतरी नवं करण्याच्या तयारीत
अलिकडेच एलॉन मस्क यांनी ट्विटर युजर्सना मोठा इशारा दिला आहे. त्यांनी ट्वीट करून सांगितलं की, आता युजर्सना ट्विटरवर प्रत्येक लेखानुसार शुल्क भरावं लागेल. यासह, जर युजर्सनी मासिक सदस्यतासाठी साइन अप केलं नाही तर त्यांना लेख वाचण्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील. मस्क म्हणाले, बर्याच लोकांसाठी हा उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत बनेल आणि त्यांना तुमच्यासाठी (युजर्स) चांगला कंटेट तयार करण्यासाठी अधिक वेळ घालवण्यास भाग पाडेल. ते म्हणाले की, सर्व पैसे कंटेंट क्रिएटर्सना दिले जातात, त्यातील एक रुपयाही कंपनी ठेवत नाही.
ट्विटर ब्लू म्हणजे काय?
ट्विटरनं घोषणा केली होती की, कंपनी सशुल्क ब्लू टिक सेवा सुरू करणार आहे. सुरुवातीला हे यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. त्यानंतर भारतातही याची सुरुवात झाली. या अंतर्गत, या सेवेसाठी पैसे देणाऱ्यांनाच त्यांच्या खात्यावर ब्लू टिक मिळू शकते. भारतात ट्विटर ब्लूचे सबस्क्रिप्शन रु. 650 पासून सुरू होते. मोबाईल युजर्सना दरमहा 900 रुपये आकारले जातात.