(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Skill Development : कौशल्यता वाढीसाठी केंद्र सरकार आणि मेटाचा करार; पाच लाख नवउद्योजकांना होणार फायदा
Central Government Meta : केंद्र सरकार आणि मेटामध्ये डिजिटल कौशल्ये तळागाळापर्यंत नेण्यासाठी तीन वर्षांसाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
नवी दिल्ली : कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि मेटा यांनी आज डिजिटल कौशल्ये तळागाळापर्यंत नेण्यासाठी तीन वर्षांसाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. देशभरातील विद्यार्थी, तरुण आणि सूक्ष्म-उद्योजकांना अखंडपणे जोडणे, त्यांच्या कौशल्यात वाढ करणे आदी उद्दिष्ट्ये या कराराची आहेत.
'Education to Entrepreneurship: Empowering a Generation of Students, Educationators and Entrepreneurs' या नावाने ओळखल्या जाणार्या भागीदारी अंतर्गत, Meta ने नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एंटरप्रेन्युअरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट (NIESBUD), ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) सोबत लेटर ऑफ इंटेंट (LoI) वर स्वाक्षरी केली.
या भागीदारीमुळे 5 लाख नवोदित आणि विद्यमान उद्योजकांना सात प्रादेशिक भाषांमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम सारख्या मेटा प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल मार्केटिंग कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या कार्यक्रमात बोलताना, केंद्रीय कौशल्य आणि विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, हा उपक्रम भारताला जगातील कौशल्याची राजधानी बनविण्यात मदत करेल. या नव्या करारामुळे डिजिटल कौशल्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे. विद्यार्थी, तरुण, कामगार आणि सूक्ष्म उद्योजकांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडण्यात येणार आहे. यामुळे आमची 'अमृत पिढी' नव्या युगातील समस्या सोडवणारे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आणि उद्योजकांमध्ये रुपांतरीत होईल, असे त्यांनी नमूद केले.
देशातील लोकशाही, लोकसंख्या आणि विविधता यांना तंत्रज्ञानाच्या रूपांतरणाशी जोडले जाणे आवश्यक आहे. जेणेकरुन तंत्रज्ञान संपूर्ण समाजासाठी जोडली जाऊ शकेल, असे प्रतिपादनही मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. सध्या करण्यात आलेल्या या करारामुळे आपल्या लोकसंख्येला डिजिटल कौशल्यांसह सुसज्ज करण्यासाठी आणि सूक्ष्म-उद्योजक आणि लहान व्यवसायांना सशक्त करण्यासाठी बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वर्षाच्या सुरुवातीला, 'मेटा'ने AICTE सोबत क्रिएटर्स ऑफ मेटाव्हर्स प्रोग्राम लाँच केला ज्या अंतर्गत 1 लाख विद्यार्थी आणि 20,000 शिक्षकांना augmented reality, आभासी वास्तव (virtual reality) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये (artificial intelligence) सक्षम केले जात आहे. एआयसीटीई-संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी अॅनिमेशनचा दोन वर्षांचा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.
'मेटा'ची युनिव्हर्सल ट्रान्सलेटर सेवा लवकरच सुरू होणार
फेसबुकची (Facebook) पॅरेंट कंपनी मेटाने (Meta) एक नवं फिचर लवकरच सुरु करणार आहेत. व्हॉइस-टू-टेक्स्ट असं हे फिचर असून यामध्ये जवळपास 100 भाषांचे भाषांतर करण्यात येणार आहे. SeamlessM4T असं या मेटाच्या नव्या फिचरचं नाव असणार आहे. तसेच युनिव्हर्सल ट्रान्सलेटर सुरु करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना यश आल्याचं देखील यानिमित्ताने म्हटलं जात आहे.
SeamlessM4T हे फिचर मोठ्या प्रमाणात अनेक भाषांचे अगदी सोप्या भाषांतर करण्यास सक्षम असणार आहे.