जहीर खानचा धोनीला चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा सल्ला
दुबई : भारताने अटीतटीच्या सामन्यात हाँगकाँगवर मात करत आशिया चषकात विजयी सलामी दिली आहे. हॉंककाँगसारख्या दुबळ्या संघानं टीम इंडियाला कडवी झुंज दिली. दोन्ही संघांची तुलना केल्यानंतर एकतर्फी वाटणारा सामना अटीतटीचा बनला होता. या सामन्यात टीम इंडियाच्या अनेक पडत्या बाजू पुन्हा एकदा समोर आल्या.
कालच्या सामन्यानंतर टीम इंडियाची चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर उपयुक्त ठरेल असा फलंदाज अजूनही भारताला सापडला नाही, हे पुन्हा समोर आलं. भारताचा माजी जलद गोलंदाज जहीर खानने या समस्येवर एक सल्ला दिला आहे.
"महेंद्रसिंह धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी", असं मत जहीरने व्यक्त केलं आहे. "आगामी विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करत चौथ्या क्रमांकावर महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूनं खेळायला हवं. चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या खेळाडूंची भूमिका महत्त्वाची असते. परिस्थितीनुसार दबावातही या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजाला उत्तम कामगिरी करणं अपेक्षित असतं. त्यामुळे धोनीच्या अनुभवाचा येथे निश्चित फायदा होईल", असं जहीरनं म्हटलं.
"टीम इंडियाची सामन्यातील सुरुवात चांगली झाली तर जिंकण्याची शक्यता वाढते. मात्र सुरुवात खराब झाली तर संघाला सावरण्यासाठी अनुभवी खेळाडूची त्यावेळी संघाला गरज असते", असंही जहीर म्हणाला.
टीम इंडियानं हाँगकाँगवर 26 धावांनी मात केली. या विजयासाठी हाँगकाँगनं भारतीय संघाला संघर्ष करायला लावला. या सामन्यात भारतानं हाँगकाँगला विजयासाठी 286 धावांचं कठीण आव्हान दिलं होतं. पण हाँगकाँगच्या नजाकत खान आणि अंशुमन रथनं 34 षटकांत 174 सलामी देऊन, भारतीय गोलंदाजांना घाम फोडला.
संबंधित बातम्या