IND vs SA: 'विराट फॉर्ममध्ये असला तरी आमचे वेगवान गोलंदाज...' भारत- द.आफ्रिका सामन्यापूर्वी एडन मार्करामचा इशारा
India vs South Africa: टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ उद्या (30 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे.
India vs South Africa: टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ उद्या (30 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पर्थ क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ या स्पर्धेत आतापर्यंत प्रत्येकी दोन सामने खेळला आहे. भारतानं आपलं दोन्ही सामने जिंकले आहेत. तर, दक्षिण आफ्रिकेचा एक सामना पावसामुळं रद्द झाला आणि दुसऱ्या सामन्यात त्यांनी बांगलादेशचा 104 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केलाय. या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करामनं भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला सावधानीचा इशारा दिलाय.
यंदाच्या टी-20 विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघातील हा सामना अतिशय रोमांचक होऊ शकतो. या सामन्यापूर्वी भारताचा महान फलंदाज विराट कोहलीला इशारा देताना दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करामने मोठी गोष्ट सांगितली आहे. "भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना रोमहर्षक असेल. आमच्या वेगवान गोलंदाजांना विराट कोहलीला गोलंदाजी करायला आवडते. विराट फॉर्ममध्ये आलाय, पण आमचे गोलंदाजही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आमच्या संघातील गोलंदाजांवर माझा पूर्ण विश्वास आहे. कगिसो रबाडा आणि नॉर्खिया भारतीय फलंदाजासाठी घातक ठरू शकतात. ऑस्ट्रेलियातील इतर मैदानांपेक्षा पर्थमध्ये जास्त बाऊन्स आहे, त्यामुळं आमचे गोलंदाज त्याचा पुरेपूर फायदा घेतील याची मला खात्री आहे", असंही एडन मार्करामनं म्हटलंय.
विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात त्यानं एकटाच्या जोरावर भारताला निसटता विजय मिळवून दिला होता. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात त्यानं 53 चेंडूत 82 धावांची खेळी केली होती. त्यानंतर नेदरलँड्सविरुद्धही 62 धावा करत भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
संभाव्य संघ-
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.
दक्षिण आफ्रिकेचा संघ:
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रीसो, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्खिया, तबरेझ शम्सी/लुंगी एनगिडी/मार्को जॅनसेन.
हे देखील वाचा-