(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात रंगणार तिरंगी मालिका; भारत, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज येणार आमने-सामने
BCCI: या तिरंगी मालिकेसाठी बीसीसीआयनं तयारी सुरू केली.
Womens's Under-19 Tri Series: यावर्षी नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात भारतीय महिला अंडर-19 संघ आणि न्यूझीलंड, वेस्ट इंडीज यांच्यात तिरंगी मालिका खेळवली जाईल. या तिरंगी मालिकेतील सामने मुंबईत होणार आहेत. या मालिकेसाठी बीसीसीआयनं तयारी सुरू केली. पुढच्या वर्षी महिला अंडर-19 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. महत्वाचं म्हणजे, पहिल्यांदाच महिला अंडर-19 विश्वचषकाचं आयोजन केलं जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय मुली चांगली कामगिरी बजावतील, अशी आशा आहे.
महिला अंडर-19 विश्वचषक स्पर्धेची तयारी
भारत, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिरंगी मालिकेबाबत बीसीसीआयनं मुंबई क्रिकेट असोसिएशनशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. या मालिकेसाठी डीवाय पाटील स्टेडियमशिवाय बीकेसी मैदान तयार करण्यात येत आहे. वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडसोबत प्रस्तावित तिरंगी मालिका 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं काय म्हटलं?
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, " आगामी महिला अंडर-19 विश्वचषक लक्षात घेता ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. जेणेकरून, भारतीय निवडकर्ते आगामी महिला अंडर-19 विश्वचषकासाठी चांगल्या खेळाडूंची निवड करू शकतील." 14 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान महिला अंडर-19 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भारतीय मुली चांगली कामगिरी बजावतील अशी अपेक्षा केली जात आहे.
टी -20 विश्वचषकात 16 संघ येणार आमने-सामने
महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारतासह अनेक संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 16 संघ खेळताना दिसणार आहेत. ही स्पर्धा जानेवारीमध्ये सुरू होणार आहे.
पात्र ठरलेले 12 संघ
महिलांच्या अंडर-19 टी-20 विश्वचषकासाठी 12 संघ थेट पात्र ठरले आहेत. यामध्ये भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे या 11 पूर्ण सदस्य देशांचा समावेश आहे. त्याच वेळी, युनायटेड स्टेट्स सदस्य राष्ट्र असल्यामुळे स्वयंचलित पात्रता देण्यात आली आहे. उर्वरित चार जागांसाठी अनेक देशांदरम्यान स्पर्धा होणार आहे.
पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान मानधन
बीसीसीआयने नुकतीच एक मोठी घोषणा केली होती, ज्यात भारतीय महिला क्रिकेटपटूंना पुरुष क्रिकेटपटूंएवढंच मानधन मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नुकतीच याबाबत माहिती दिली. महिला क्रिकेटसाठी हे महत्त्वाचं पाऊल मानलंजात आहे. आतापर्यंत महिला क्रिकेटपटूंना पुरुष क्रिकेटपटूंच्या तुलनेत कमी मानधन मिळायचं. परंतु, आता बीसीसीआयनं पुरुष आणि महिला खेळाडूंना समान मानधन देण्याचा ठरवलं आहे.
हे देखील वाचा-