एक्स्प्लोर
World Cup 2019 Ind Vs NZ | पावसामुळे सामना रद्द, भारत-न्यूझीलंडला प्रत्येकी एक गुण
आऊटफील्ड ओलं असल्यामुळे आणि पावसाचा व्यत्यय सुरुच राहिल्याने पंचांनी भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

नॉटिंगहॅम : भारत आणि न्यूझीलंड संघांमधला विश्वचषकातला साखळी सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. नॉटिंगहॅममधल्या या सामन्याआधी नाणेफेकही होऊ शकली नाही. अखेर सामना रद्द करत दोन्ही संघांना एक-एक गुण बहाल करण्यात आला आहे.
सामन्यापूर्वी पंचांनी चार, पाच आणि सहा वाजता खेळपट्टी आणि मैदानाचं निरीक्षण केलं. आऊटफील्ड ओलं असल्यामुळे आणि पावसाचा व्यत्यय सुरुच राहिल्याने पंचांनी खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
यंदाच्या विश्वचषकात पावसाने चांगलाच गोंधळ घातला आहे. आतापर्यंत 17 सामन्यांपैकी चार वेळा पावसामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली आहे. न्यूझीलंड, भारत यांच्यासह वेस्ट इंडीज, बांगलादेश, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका या सात संघांचे सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. श्रीलंकेला तर दोन वेळा सामना रद्द झाल्यामुळे थेट दोन गुणांची बक्षिसी मिळाली आहे.
आदल्याच दिवशी मराठमोळा क्रिकेटपटू केदार जाधवने 'जा रे जा रे पावसा, माझ्या महाराष्ट्रात जा, तुला माझ्या महाराष्ट्रात जायची गरज आहे, तिकडे जास्ती गरज आहे पावसाची, इकडे नाही' अशी पावसाला आर्त हाक घालणारी दहा सेकंदांची क्लीप इंग्लंडमधील नॉटिंगहॅममधल्या स्टेडियमवरुन पोस्ट केली होती.
अजिंक्य संघ
विश्वचषकाच्या रणांगणात टीम इंडियाचा सामना तुल्यबळ न्यूझीलंडशी होणार होता. भारताने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला हरवून विश्वचषक मोहिमेची मोठ्या झोकात सुरुवात केली. न्यूझीलंडनेही श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानला नमवून, तीनपैकी तीन सामन्यांमध्ये विजय साजरा केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडसोबतचा सामना चुरशीचा होईल, असं मानलं जात होतं. परंतु विश्वचषकात आतापर्यंत अपराजित राहिलेले हे दोन्ही संघ अजूनही अजिंक्य आहेत.
रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान असा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. अशा परिस्थितीत तणावात असलेल्या क्रिकेटपटूंनी सामन्यावरील पावसाचं सावट दूर व्हावं, यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
व्यापार-उद्योग
नांदेड
Advertisement
Advertisement



















