एक्स्प्लोर
सचिनमुळे विनोद कांबळी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात!
'क्रिकेटच्या मैदानावर मी खेळाडू नाही तर कोच म्हणून परतणार आहे. मी हा निर्णय सचिनच्या सल्ल्यानुसार घेतला आहे.'
![सचिनमुळे विनोद कांबळी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात! vinod kambli back on cricket field latest update सचिनमुळे विनोद कांबळी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/04115103/Sachin-and-vinod.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : क्रिकेटच्या मैदानावरील सचिन आणि विनोदची जोडी आजही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात आहे. या जोडीनं शालेय क्रिकेट स्पर्धेपासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत बरेच विक्रम रचले. सचिनचा क्रिकेट प्रवास प्रदीर्घ होता. पण विनोदचं क्रिकेट करिअर फारसं पुढे जाऊ शकलं नाही. पण आता कांबळी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. यासाठी विनोदनं आपला बालपणीचा मित्र सचिनचे आभारही मानले आहेत.
डावखुरा फलंदाज विनोद कांबळी यापुढे प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'क्रिकेटच्या मैदानावर मी खेळाडू नाही तर कोच म्हणून परतणार आहे. मी हा निर्णय सचिनच्या सल्ल्यानुसार घेतला आहे.' असं कांबळीनं सांगितलं.
'जेव्हा मी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्यानंतर मी समालोचक किंवा टीव्हीवर क्रिकेट एक्सपर्ट म्हणून जात होतो. पण क्रिकेटविषयी माझं प्रेम कायम होतं. म्हणून आता मी मैदानावर परतत आहे.' मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी परिसरातील एका क्रिकेट कोचिंग अकादमीच्या लाँचिंग सोहळ्याला विनोद कांबळी उपस्थित होता. त्याचवेळी त्यानं ही घोषणा केली. या अकादमीमध्ये तो प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावणार आहे.
'सचिनला माहिती आहे की, मला क्रिकेटविषयी किती प्रेम आहे. त्यासाठीच त्याने मला प्रशिक्षक होण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्याने जो रस्ता मला दाखवला आहे त्याच मार्गावर चालण्याचा मी प्रयत्न करेन.' असंही तो यावेळी म्हणाला.
'आचरेकर सरांकडून मिळालेले धडे आणि त्यांनी शिकवलेल्या गोष्टी मी मुलांना देण्याचा प्रयत्न करेन.' असंही तो म्हणाला.
दरम्यान, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे दोघेही दिग्गज क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे शिष्य आहेत. सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये द्विशतक ठोकणारा कांबळी हा भारताचा पहिला फलंदाज आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)