एक्स्प्लोर
मला पुरुष म्हणून हिणवायचे, सेरेनाचं आईला भावनिक पत्र
मी दमदार खेळी केल्यामुळे माझं कौतुक झालं, पण मी ताकदवान दिसत असल्याने मला पुरुषी संबोधलं जायचं. मी ड्रग्ज घेतल्याचंही म्हटलं जायचं, असं सेरेना विल्यम्सने आईला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे

मुंबई : टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सने तिच्या आईला लिहिलेलं भावनिक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. आपल्या दिसण्यावरुन अनेक जण पुरुष म्हणून हिणवत असल्याची खंत सेरेनाने पत्रात व्यक्त केली आहे. 'मला माहित असलेल्या सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक' असा उल्लेख करत सेरेनाने आई ऑरेसन प्राईजकडे मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सने काही दिवसांपूर्वीच मुलीला जन्म दिला. तिने आपली लेक अॅलेक्सिस ऑलिम्पियाचा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सेरेना सध्या मातृत्वाचा आनंद उपभोगत आहे, मात्र याच वेळी मनात असलेली अस्वस्थता व्यक्त करणारं भावनिक पत्र सेरेनानं आपल्या आईला लिहिलं आहे. 35 वर्षीय सेरेनाची बहीण विनस विल्यम्सचाही टेनिसच्या क्षेत्रात दबदबा आहे. सेरेनाने 23 वेळा ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावलं आहे. 'आपण स्त्री आहोत आणि त्याचा अभिमान आहे' 'मी माझ्या मुलीकडे बघत होते. (अरे देवा, हो.. मला मुलगी आहे) तिच्याकडे माझ्यासारखे दंड आणि पाय आहेत. मी 15 वर्षांची असल्यापासून ज्या त्रासाला सामोरी गेले आहे, त्याला जर तिलाही सामोरं जावं लागलं, तरी मी कशी रिअॅक्ट होईन माहित नाही.' 'मी दमदार खेळी केल्यामुळे माझं कौतुक झालं, पण मी ताकदवान दिसत असल्याने मला पुरुषी संबोधलं जायचं. मी ड्रग्ज घेतल्याचंही म्हटलं जायचं. मी महिला टेनिसमध्ये नाही, पुरुष टेनिसमध्ये असायला हवं, असं म्हणायचे. कारण इतर महिलांच्या तुलनेत मी कणखर दिसायचे. (मी जास्त कष्ट घ्यायचे आणि जन्मापासूनच माझी ही शरीरयष्टी होती. मला त्याचा अभिमान आहे)' असं सेरेना पुढे म्हणते. 'आम्ही सगळ्या सारख्या दिसत नाही. आम्ही कणखर आहोत, उंच, लहान, पिळदार... पण आमच्यात एक गोष्ट समान आहे.. आम्ही महिला आहोत आणि त्याचा अभिमान आहे.' असं सेरेना अभिमानाने सांगते. 'आई, मला वचन दे, तू कायम माझी मदत करशील. मला माहिती नाही मी तुझ्यासारखी नम्र आणि शक्तिशाली आहे का. पण एक ना एक दिवस तुझ्यासारखी होईन, अशी आशा आहे. आय लव्ह यू' अशा भावना सेरेना विल्यम्सने व्यक्त केल्या आहेत.
गरोदरपणाची बातमी शक्य तितके महिने गुप्तच ठेवण्याचा आपला प्रयत्न होता. पण आपल्याच अनवधानानं बिकिनीतला तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाला आणि ती बातमी फुटली असं सेरेनानं सांगितलं होतं. ऑस्ट्रेलियन ओपनच्या दोनच दिवसआधी आपण गरोदर असल्याचं कळल्याची कबुलीही तिनं दिली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळायचं की, नाही याबाबत मी द्विधा मनस्थितीत होते, असंही सेरेना म्हणाली. माझं खेळणं बाळासाठी धोकादायक ठरु शकलं असतं, त्यामुळे मी वेगळ्या पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न केला. शक्य तितका ताण आणि थकवा टाळण्याचा प्रयत्न केल्याचंही सेरेनाने स्पष्ट केलं. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात 'रेडिट' या वेबसाईटचा सहसंस्थापक अॅलेक्सिस ओहानियनसोबत सेरेनाचा साखरपुडा झाला होता. जानेवारी महिन्यात सेरेनानं बहीण व्हीनस विल्यम्सला हरवून ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर ती टेनिसच्या कोर्टपासून दूर राहिली. सेरेनाने आतापर्यंत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदं पटकावण्याचा मान मिळवला आहे.
आणखी वाचा























