(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sachin Tendulkar on Shubman Gill : शुभमन गिलचा शतकी नजारा; कौतुक करताना सचिन तेंडुलकरच्या दोनच वाक्यांनी सर्वांचे लक्ष वेधले!
शुभमन गिलने 332 दिवस आणि 12 डावांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकलं आहे. याआधी गिलचे शेवटचे शतक 9 मार्च 2023 रोजी अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाले होते.
Sachin Tendulkar on Shubman Gill : गेल्या अनेक महिन्यांपासून चाचपडत असलेल्या शुभमन गिलने अखेर शतकी खेळी केली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामन्यात शुभमन गिलची चमक पाहायला मिळाली. दुसऱ्या डावात गिलने शतक झळकावले. गिलने 132 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मात्र, शतकानंतर तो आपला डाव पुढे नेऊ शकला नाही आणि शोएब बशीरच्या चेंडूवर तो बाद झाला. गिलने 147 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 104 धावांची खेळी खेळली. गिलच्या कसोटी कारकिर्दीतील हे तिसरे शतक ठरले.
दुष्काळ शेवटी संपला
शुभमन गिलने 332 दिवस आणि 12 डावांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकलं आहे. याआधी गिलचे शेवटचे शतक 9 मार्च 2023 रोजी अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाले होते. त्या शतकानंतर गिलला 12 डावांत अर्धशतकही करता आले नव्हते. त्या डावांमध्ये, गिलने 13, 18, 6, 10, 29*, 2, 26, 36, 10, 23, 0 आणि 34 धावा खेळल्या. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात गिलची बॅट पूर्णपणे शांत होती आणि चार कसोटी डावांत तो केवळ 74 धावा करू शकला. या शतकासह 24 वर्षीय शुभमन गिलने खास विक्रम केला आहे. गिल वयाच्या 24 व्या वर्षी 10 आंतरराष्ट्रीय शतके करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. गिलच्या आधी फक्त सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली वयाच्या 24 व्या वर्षी 10 किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय शतके करू शकले होते. गिलने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सात शतके आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातही एक शतक झळकावले आहे.
This innings by Shubman Gill was full of skill!
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 4, 2024
Congratulations on a well timed 100!#INDvENG pic.twitter.com/rmMGE6G2wA
सचिनकडून शुभमन खेळीचे कौतुक
गिलच्या खेळीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आनंद व्यक्त केला. गिलची ही पूर्ण कौशल्यपूर्ण होती. योग्यवेळी केलेल्या शतकासाठी हार्दिक अभिनंदन असे ट्विट करून सचिनने म्हटले आहे. दुसरीकडे, गिलची खेळी पाहण्यासाठी त्याचे वडिलही मैदानात होते. त्यामुळे नक्कीच गिलचा आनंद द्विगुणित झाला असेल. दुसरीकडे, सहा वर्षांनंतर भारतीय खेळाडूने घरच्या मैदानावर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटी शतक झळकावले आहे. याआधी, भारतासाठी घरच्या मैदानावर नंबर-3 वरचे शेवटचे शतक चेतेश्वर पुजाराने नोव्हेंबर 2017 मध्ये केले होते. त्यानंतर पुजाराने श्रीलंकेविरुद्ध नागपुरात शतक झळकावले.
गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या फायनलनंतर चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आले होते. अशा परिस्थितीत गिलला तिसऱ्या क्रमांकावर उतरवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला. वेस्ट इंडिज दौऱ्यापासून आतापर्यंत गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने प्रथमच कसोटी शतक झळकावले आहे. गिलनेही शतक झळकावून टीकाकारांना उत्तर दिले आहे. गिलने 22 कसोटी सामन्यांमध्ये 31.60 च्या सरासरीने 1201 धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.
अनिल कुंबळे यांनी गिलवर प्रश्न उपस्थित केला
अलीकडेच भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी गिलच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले होते. खराब फॉर्ममध्ये झगडणाऱ्या शुभमन गिलला संघात जशी सुरक्षा मिळाली तशी सुरक्षा चेतेश्वर पुजाराला कधीच मिळाली नाही, असे कुंबळे यांनी म्हटले होते. अशा स्थितीत पुढील 3 सामन्यांमध्ये टीम इंडियातील बदलांबाबत निवडकर्ते निश्चितपणे विचार करतील, अशी अपेक्षा आहे. तर रवी शास्त्री समालोचन करताना गिलबद्दल म्हणाले होते की, तुम्ही लक्षात ठेवा की पुजारा बाहेर वाट पाहत आहे. रणजीमध्ये त्याचा फॉर्म उत्कृष्ट राहिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या