एक्स्प्लोर
रिओ ऑलिम्पिक 2016 अपडेट्स
भारताच्या पुरुष आणि महिला हॉकीसंघासमोर तगडं आव्हान
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघांना आज तगड्या आव्हानाचा मुकाबला करायचा आहे. पुरुषांच्या हॉकीत भारताचा दुसऱा साखळी सामना गतविजेत्या जर्मनीशी होणार आहे. हा सामना आज सायंकाळी 7.30 वाजता सुरु होईल. भारताने सलामीच्या सामन्यात आयर्लंडवर 3-2 असा विजय मिळवला होता. त्यामुळे जर्मनीविरुद्ध सामन्यासाठी भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. महिलांच्या हॉकीत भारत आणि ग्रेट ब्रिटन संघांमधला सामना मध्यरात्रीनंतर 1.30 वाजता खेळवण्यात येईल.
अभिनव बिंद्रा आणि गगन नारंगवर भारतीयांच्या नजरा
बीजिंग ऑलिम्पिकचा सुवर्णपदकविजेता अभिनव बिंद्रा आणि लंडन ऑलिम्पिकचा कांस्यविजेता गगन नारंग आज पदकाच्या शर्यतीत उतरणार आहेत. त्यामुळे रिओ ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर्स एअर रायफल प्रकारात अभिनव आणि गगनच्या कामगिरीवर भारतीय चाहत्यांचं लक्ष राहिल. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज संध्याकाळी 5.30 वाजता 10 मीटर्स एअर रायफल प्रकाराची प्राथमिक फेरी होणार आहे. प्राथमिक फेरीतल्या आठ सर्वोत्तम नेमबाजांचा समावेश असलेल्या अंतिम फेरीला रात्री 8.30 वाजता सुरु होईल. ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दोन दिवसांमध्ये भारतीय नेमबाजांच्या पदरी निराशाच पडली होती. आता अभिनव बिंद्रा आणि गगन नारंग ते चित्र बदलणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने इतिहास रचला
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने फायनल गाठून नवा इतिहास घडवला आहे. दीपा कर्माकरने व्हॉल्ट प्रकारात 14.850 गुणांची कमाई करुन आठवं स्थान मिळवलं. आणि फायनलमधलं आपलं स्थानही पक्क केलं. दीपाने व्हॉल्ट प्रकारात पहिल्या प्रयत्नातच 15.100 गुणांची कमाई केली. तर दुसऱ्या प्रयत्नात दीपाने 14.600 गुणांची वसूली केली. महिलांच्या व्हॉल्ट प्रकाराची फायनल 14 ऑगस्टला रात्री 11.15 वाजता खेळवली जाईल. 22 वर्षीय दीपा ऑलिम्पिक गाठणारी पहिलीच भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली आहे. त्यामुळे दीपाची ही कामगिरी खऱोखरंच कौतुकास्पद आहे.दीपा कर्माकरचं अनइव्हन बार, बॅलन्सिंग बिम आणि फ्लोअर एक्सरसाईजमधलं आव्हान मात्र संपुष्टात आलं. दीपाने अनइव्हन बारमध्ये 11.666, बॅलन्सिंग बिममध्ये 12.866 आणि फ्लोअर एक्सरसाईजमध्ये 12.033 गुणांची कमाई केली.
महिला तिरंदाजांचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात
भारताच्या महिला तिरंदाजांचं रिओ ऑलिम्पिकमधलं आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं. महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात दीपिकाकुमारी, बोम्बायला देवी आणि लक्ष्मीराणी माझी यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला रशियाकडून पराभव स्वीकारावा लागला. रशियाने भारतावर 5-4 असा विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यात रशियाने पहिल्या सेट 55-48 असा जिंकला होता. पण बोम्बायला देवी आणि लक्ष्मीराणीच्या अचूक निशाण्यामुळं भारताने दुसरा सेट 53-52 आणि तिसरा सेट 53-50 असा जिंकून 4-2 अशी आघाडी घेतली. पण चौथ्या सेटमध्ये रशियाने भारतीय तिरंदाजांचा संघर्ष 55-54 असा एका गुणाने मोडून काढला आणि सामन्यात 4-4 अशी बरोबरी साधली. त्यामुळे सामना शूटऑफमध्ये खेळवण्यात आला. शूटऑफमध्ये दोन्ही संघांना प्रत्येकी तीन संधी देण्यात आल्या. त्यात रशियाने 25 गुणांची कमाई केली. पण भारतीय तिरंदाजांना केवळ 23 गुणांचीच कमाई करता आली. त्यामुळं रशियाला भारतावर 5-4 असा विजय मिळवता आला. महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात कोरियानं सुवर्ण, तर रशियाने रौप्यपदकाची कमाई केली.
भारतीय हॉकी महिलांनी जपानाला बरोबरीत रोखलं
तब्बल 36 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करणाऱ्या भारताच्या महिला हॉकी संघाने पहिल्याच सामन्यात जपानला 2-2 असं बरोबरीत रोखण्याचा पराक्रम गाजवला आहे. महिला हॉकीच्या जागतिक क्रमवारीत भारत तेराव्या, तर जपान दहाव्या क्रमांकावर आहे. त्यात जपानने पहिल्या दोन सत्रांमध्ये 2-0 अशी आघाडी घेऊन सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. त्या प्रतिकूल परिस्थितीत भारतीय महिलांनी संघर्षपूर्ण खेळ करुन जपानला 2-2 असं बरोबरीत रोखलं. जपानकडून एमी निशिकोरीने 15व्या आणि नाकाशिमाने 28व्या मिनिटाला गोलची नोंद केली. भारताच्या रानी रामपालने 31व्या आणि लिलिमा मिन्झने 40व्या मिनिटाला प्रत्येकी एकेक गोल केला.
अंतिम फेरी गाठण्यात हीना सिद्धूला अपयश
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांची पाटी दुसऱ्या दिवशीही कोरीच राहिली. भारताच्या हीना सिद्धूला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत अंतिम फेरी गाठण्यात अपयश आलं. हीनानं पात्रता फेरीत 380 गुणांची कमाई करून चौदावं स्थान मिळवलं. पण पहिल्या आठ नेमबाजच अंतिम फेरीसाठी पात्र ठरत असतात. त्यामुळं हीनाला एअर पिस्टलच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळू शकलं नाही. तिला पाच गुणांनी अंतिम फेरीच्या तिकीटाने हुलकावणी दिली.
नेदरलँड्सच्या सायकलपटूचा पाठीचा कणा फ्रॅक्चर
रिओ ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही अपघातांची मालिका सुरु राहिली. नेदरलँड्सची सायकलपटू अनेमिक वॅन व्लूटेनला शर्यतीतदरम्यान अपघात झाला. यात तिच्या पाठिच्या कण्याला फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळतेय. सध्या अनेमिकला आयसीयूत दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर असल्याचंही कळतंय. महिलांच्या सायकल शर्यतीत अनेमिक सुवर्णपदकापासून केवळ 10 किलोमीटर दूर होती. पण एका अवघड वळणावर अनेमिकच्या सायकलचा टायर लॉक झाला. त्यामुळं ती सायकलवरुन उडून रस्त्याच्या शेजारी असलेल्या दगडावर आपटली. यानंतर ती काही काळ बेशुद्ध अवस्थेत पडून होती
विल्यम्स भगिनींनी पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळला
तीनवेळच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या सेरेना विल्यम्स आणि व्हिनस विल्सम्स जोडीला पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंड़ाळावा लागला. चेक रिपब्लिकच्या ल्युसी सॅफारोव्हा आणि बार्बोरा स्ट्रायकोव्हा जोडीने विल्सम्स भगिनींवर 6-3, 6-4 असा सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवला. 2000, 2008 आणि 2012 अशा सलग तीन ऑलिम्पिकमध्ये विल्यम्स भगिनींनी सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. पण यंदा त्यांना रिकाम्या हातीच परतावं लागलं.
चीनच्या वेटलिफ्टर लॉन्ग क्विन्गक्वॉनचा विश्वविक्रम
रिओ ऑलिम्पिकमध्ये चीनचा वेटलिफ्टर लॉन्ग क्विन्गक्वॉनने नवा विश्वविक्रम रचला आहे. लॉन्ग क्विन्गक्वॉनने 56 किलो वजनी गटात स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारात एकूण 307 किलो वजन उचलून विश्वविक्रमाची नोंद केली. लॉन्गने स्नॅचमध्ये 137 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 170 किलो वजन उचलण्याचा पराक्रम गाजवला. 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये नॉर्थ कोरियाच्या ओम यून चोलने 303 किलो वजन उचललं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement