MCA launches Women's T20 Mumbai League : मुंबई क्रिकेटची मोठी घोषणा! महिला टी-20 मुंबई लीग लॉन्च; तीन संघांवर 4 कोटींची बोली
MCA launches Women's T20 Mumbai League : मुंबई क्रिकेट असोसिएशनने महिला टी-20 मुंबई लीगची अधिकृत घोषणा केली आहे.

MCA launches Women's T20 Mumbai League : मुंबई क्रिकेट असोसिएशनने महिला टी-20 मुंबई लीगची अधिकृत घोषणा केली आहे. पुरुषांच्या टी-20 मुंबई लीगच्या धर्तीवर ही फ्रेंचायझी-आधारित स्पर्धा रंगणार असून, तीन संघांच्या विक्रीतून असोसिएशनला तब्बल 4 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे. ही लीग 1 ते 15 जूनदरम्यान आयोजित होण्याची शक्यता आहे.
एकूण 7 सामने रंगणार
महिला टी-20 मुंबई लीगमध्ये एकूण 7 सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत तीन आयकॉन खेळाडूंचा समावेश असणार असून, त्यासाठी जेमिमाह रॉड्रिग्स, सायमा ठाकोर आणि सायली सातघरे यांच्या नावांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या उपलब्धतेबाबत अंतिम निर्णय अद्याप बाकी आहे.
ही स्पर्धा केवळ मुंबईतील महिला क्रिकेटपटूंसाठीच असणार आहे. तसेच, खेळाडूंची लिलाव प्रक्रिया राबवण्याची तयारीही असोसिएशनने सुरू केली आहे.
शनिवारी झालेल्या लिलावात पीआरएस इन्फ्राप्रोजेक्ट्स एलएलपीने सर्वाधिक 2 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावत आघाडी घेतली. त्यानंतर रोडवे सोल्यूशन इंडिया इन्फ्रा लिमिटेडने 1 कोटी 9 लाख रुपयांची बोली लावली, तर वर्ल्ड स्टार स्पोर्टिंग प्रायव्हेट लिमिटेडने 79 लाख रुपयांची बोली लावत संघांचे हक्क संपादन केले.
अजिंक्य नाईक काय म्हणाले?
अजिंक्य नाईक यांनी म्हटले आहे की, “टी-20 मुंबई महिला लीगसाठी झालेल्या बोली प्रक्रियेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा मुंबईतील महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्याच्या आमच्या दूरदृष्टीला मिळालेला ठोस पाठिंबा आहे. नामांकित कॉर्पोरेट समूहांचा सहभाग हा महिला क्रिकेटविषयी वाढत चाललेल्या व्यावसायिक विश्वासाचे प्रतीक आहे. उदयोन्मुख खेळाडूंना भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही स्पर्धात्मक आणि व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित लीग उभारण्यास कटिबद्ध आहोत.”
टी-20 मुंबई लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजदीप गुप्ता यांनी सांगितले की, ही प्रक्रिया महिला लीगसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. फ्रँचायझी मालकांच्या सहकार्याने दर्जेदार आणि स्पर्धात्मक स्पर्धा आयोजित करण्याचा त्यांचा मानस असून, या माध्यमातून मुंबईतील महिला क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी भक्कम व्यासपीठ उपलब्ध होईल, असा त्यांना विश्वास आहे.
हे ही वाचा -





















