एक्स्प्लोर
विंडीजच्या स्फोटक फलंदाजांना लगाम घालण्यासाठी भारताची दोन अस्त्र मैदानात
जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार भारतीय संघात नसणं किती महागात पडू शकतं याची प्रचिती विशाखापट्टणम वन डेत आली. भारताच्या याच बेसावधपणाचा फायदा घेत विंडीजचे फलंदाज अक्षरशः तुटून पडले.

पुणे : टीम इंडियाच्या शिलेदारांना किंवा बीसीसीआयच्या सिलेक्टर्सना वाटलं नव्हतं त्यापेक्षा वेस्ट इंडिजची फलंदाजी भलतीच तगडी निघाली. विंडीज फलंदाजांनी गुवाहाटीच्या पहिल्या वन डेत 322 धावांचा डोंगर उभारला, तर विशाखापट्टणमच्या वन डेत त्यांनी भारताच्या 322 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून सामना चक्क टाय केला. विंडीज फलंदाजीची ही ताकद लक्षात घेऊन, टीम इंडियाने त्यांना रोखण्यासाठी ठेवणीतली दोन अस्त्रं बाहेर काढली आहेत. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा या दोन अस्त्रांसह भारत आता मैदानात उतरणार आहे. वेस्ट इंडिजच्या शाय होप आणि शिमरॉन हेटमायर यांनी भारतीय आक्रमणाच्या अब्रूची लक्तरं गुवाहाटी आणि विशाखापट्टणमच्या वेशीवर टांगली. उमेश यादव, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि खलिल अहमद यांच्या गोलंदाजीवर विंडीज फलंदाजांनी अक्षरश: दरोडा घातला. होप आणि हेटमायरने त्या चौघांकडून तब्बल सातच्या इकॉनॉमी रेटने धावांची लूट केली. त्यामुळेच गुवाहाटीच्या वन डेत विंडीजने 50 षटकांत 322 धावांचा डोंगर उभारला, तर विशाखापट्टणमच्या वन डेत विंडीजने भारताच्या 322 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून सामना टाय केला. टीम इंडियाने दोन सामन्यांअखेर 2-0 अशी आघाडी घेतली असती, तर उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांच्या पहिल्या दोन वन डेतल्या अपयशाकडे दुर्लक्ष झालं असतं. पण होप आणि हेटमायरने विशाखापट्टणमची वन डे टाय केली आणि एमएसके प्रसाद यांची पाच सदस्यीय निवड समिती खडबडून जागी झाली. विंडीजची फलंदाजी दुबळी मानून याच पाच जणांनी भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराला दोन कसोटी आणि दोन वन डे सामन्यांमधून विश्रांती दिली होती. विंडीज फलंदाजीबाबतचा त्यांचा अंदाज कसोटी मालिकेत अचूक ठरला. पण वन डेत विंडीज फलंदाजी आजही तगडी असल्याचं होप आणि हेटमायरने दाखवून दिलं. टीम इंडियाच्या दृष्टीने वेगवान आक्रमणाइतकीच महेंद्रसिंग धोनीची फलंदाजीतली कामगिरी चिंतेची बाब ठरली आहे. आशिया चषकात खोऱ्याने धावा करणाऱ्या शिखर धवनला अजूनही सूर गवसलेला नाही. पण रोहित शर्मा, विराट कोहली आणि अंबाती रायुडूच्या कामगिरीने धवनचं अपयश झाकून ठेवलं. पण विराटची लागोपाठ दोन वन डेतली शतकं, रोहितचं पहिल्या वन डेतलं शतक आणि रायुडूचं दुसऱ्या वन डेतलं अर्धशतक या पार्श्वभूमीवर भारताच्या पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकांवरच्या फलंदाजांचं अपयश उठून दिसतं. या तीन फलंदाजांमध्ये धोनी, रिषभ पंत आणि रवींद्र जाडेजाचा समावेश होतो. आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने टीम इंडियाचा हा कच्चा दुवा कधी दूर होणार हा प्रश्न आहे. त्यामुळे पुण्याच्या वन डेत धोनी, पंत आणि जाडेजाच्या फलंदाजीतल्या कामगिरीवर भारतीय संघव्यवस्थापनाची नजर राहिल. त्याच वेळी विशाखापट्टणमच्या वन डेत टाय सामन्याने भारतीय मनाला झालेली जखम पुण्यात विजयाने भरून निघावी, हीच टीम इंडियाच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.
आणखी वाचा























