Women’s World Boxing Championships 2023 : लव्हलिना, साक्षीची उपांत्यपूर्व फेरीत धडक, प्रिती पवार पराभूत
Womens World Boxing Championship : बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे 52 किलो वजनी गटात साक्षी चौधरीने कझाकस्तानच्या झाजिरा उराकबायेवाचा 5-0 असा पराभव करुन अंतिम आठमध्ये स्थान मिळवले.
Women's World Boxing Championship 2023 : टोकियो ऑलिम्पिक पदक विजेती आणि दोन वेळा जागतिक चॅम्पियनशिपची कांस्यपदक विजेती बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनने (Lovlina Borgohain) जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या (Womens World Boxing Championship) उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. लव्हलिना प्रथमच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 75 किलो वजनी गटात खेळत आहे. तिने मेक्सिकोच्या अल्वारेझ फातिमा हेरेराचा 5-0 असा पराभव केला. दुसरीकडे 52 किलो वजनी गटात साक्षी चौधरीने (Sakshi Chaudhary) कझाकस्तानच्या झाजिरा उराकबायेवाचा 5-0 असा पराभव करुन अंतिम आठमध्ये स्थान मिळवले. परंतु 54 किलो वजनी गटात प्रिती पवारला (Preeti Pawar) थायलंडच्या जितपांग जुतामासकडून 3-4 ने पराभव पत्करावा लागला. रिव्ह्यूमध्ये तिचा पराभव झाला.
पुढील सामन्यात तिच्या खेळात सुधारणा करेन : लव्हलिना
लव्हलिनाने आतापर्यंत 69 किलो वजनी गटात मोठे यश मिळवलं आहे, परंतु ऑलिम्पिकसाठी तिने नवीन 75 किलो वजनी गटात प्रवेश केला आहे. हेरेराची उंची लव्हलिनाच्या उंचीपेक्षा खूपच कमी आहे. तिने आपल्या पंचने लव्हलिनाला चांगलंच दमवलं, परंतु लव्हलिनाने अनेक वेळा शानदार बचावच केला नाही तर काऊंटर पंचसह गुणही मिळवले. एवढ्या मोठ्या चॅम्पियनशिपमध्ये प्रथमच 75 वजनी गटात खेळत असल्याचे लव्हलिनाने सांगितलं. पुढील सामन्यांमध्ये मी माझ्या खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन. मायदेशातील प्रेक्षकांचा पाठिंब्यामुळे कायमच प्रोत्साहन मिळतं, असं तिने सांगितलं.
चुरशीच्या लढतीची अपेक्षा होती : साक्षी
दुसरीकडे आशियाई चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेत्या झजिराविरुद्धचा सामना कठीण असेल, अशी साक्षी चौधरीची अपेक्षा होती. परंतु हा सामना एकतर्फी झाला. ज्यात साक्षीने 5-0 असा विजय मिळवला. आपल्याला चुरशीच्या लढतीची अपेक्षा होती, त्यामुळेच ती प्रशिक्षकांसह झजिराचे मागील सात-आठ सामने पाहण्यासाठी आली होती. ते सामने पाहून, त्यानुसार त्यांनी रणनीती आखली होती. या विजयामुळे साक्षीचा आत्मविश्वास वाढला आहे. दरम्यान उपांत्यपूर्व फेरीत साक्षीची लढत चीनच्या वू यू सोबत होणार आहे.
थांयलंडच्या जितपांगकडून प्रिती पवारचा पराभव
या स्पर्धेत प्रितीला मात्र थायलंडच्या जितपांग जुतामासकडून पराभवाचा सामना करावा लागला. मागील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जितपांगने रौप्यपदक जिंकलं होतं. 52 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तिला निखत जरीनने पराभूत केले. परंतु या सामन्याच्या पहिल्या फेरीत प्रितीने जितपांगविरुद्ध जबरदस्त खेळी केली. या फेरीत ती 4-1 ने पुढे होती. पण दुसऱ्या फेरीच्या सुरुवातीपासूनच जितपांगने प्रितीविरुद्ध आक्रमक खेळ केला. प्रीतीने पुनरागमन केले, परंतु ही फेरी जितपांगने 2-3 अशी जिंकली. तिसरी फेरीही चुरशीची झाली. पण पाच न्यायाधीश, निरीक्षक आणि पर्यवेक्षक यांच्या गुणांची बेरीज केल्यावर निर्णय तिच्या विरुद्ध 3-4 असा गेला.