Hardik Pandya IPL 2024: हार्दिक पांड्याचं सर्वात मोठं रहस्य...; माजी खेळाडूने सत्य लपवत असल्याचा केला दावा
Hardik Pandya IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात पहिले षटक टाकून हार्दिक पांड्या चर्चेचा विषय बनला होता.
Hardik Pandya IPL 2024 Marathi News: आयपीएल 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यापूर्वी आपल्या खराब कर्णधारामुळे ट्रोल झालेल्या हार्दिकवर आता दुखापत लपवत असल्याचा आरोप केला जात आहे.
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज सायमन डूलने 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी हार्दिक पांड्याला भारतीय संघात स्थान मिळण्याबाबत शंका व्यक्त केली आहे. सायमनला खात्री आहे की, हार्दिक काही दुखापती लपवत आहे, त्यामुळे गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने मुंबई इंडियन्ससाठी फार कमी गोलंदाजी केली आहे.
सायमन डूल नेमकं काय म्हणाला?
क्रिकबझवर चर्चा करताना सायमन डूल म्हणाला की, पहिल्या सामन्यात पहिले षटक टाकून हार्दिक पांड्या चर्चेचा विषय बनला होता. पण त्यानंतर अचानक मुंबई इंडियन्सच्या संघाला हार्दिकच्या गोलंदाजीची गरज नसल्याचे दिसत आहे. हे अचानक बदलले आहे. हार्दिक पांड्या जखमी आहे, असं मला वाटत असल्याचं सायमन डूलने सांगितले.
हार्दिक पांड्याला दुखापत?
याच चर्चेत सहकारी विश्लेषक हर्षा भोगले यांनी जेव्हा हार्दिकला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात फक्त फलंदाज म्हणून स्थान मिळवता येईल का, असा प्रश्न केला. प्रत्युत्तरादाखल सायमन डूलने सांगितले की, पांड्या भारतीय संघात निश्चितपणे जागा मिळवू शकतो, मात्र यासाठी त्याला मुंबई इंडियन्सकडून खेळताना सलग 4 षटके टाकावी लागतील. डूलच्या मते, अशी काही दुखापत आहे जी हार्दिक पांड्याला गोलंदाजी टाकण्यापासून त्याला रोखत आहे.
आतापर्यंत एकूण 8 षटके टाकली-
दुखापतीमुळे पांड्या 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात खेळू शकला नाही. त्यानंतर ऑक्टोबर 2023 पासून आयपीएल 2024 सुरू होईपर्यंत त्याने कोणतेही क्रिकेट खेळले नाही. हार्दिक पांड्याने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत एकूण 8 षटके टाकली आहेत, ज्यामध्ये त्याने 11 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा देत फक्त 1 विकेट घेतली आहे.
गुणतालिकेत कोण-कोणत्या स्थानावर?
आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेला राजस्थान रॉयल्स 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स 6-6 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. KKR चा नेट रनरेट +1.528 आणि चेन्नईचा +0.666 आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघ प्रत्येकी 6 गुणांसह पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. हैदराबादचा निव्वळ नेट रनरेट +0.344 आणि गुजरातचा -0.637 आहे. त्याखालोखाल मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स 4-4 गुणांसह अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. मुंबईचा नेट रनरेट -0.073 आणि पंजाबचा -0.196 आहे. त्यानंतर गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तळाच्या 10व्या स्थानावर आहे. आरसीबी हा या हंगामातील एकमेव संघ आहे, ज्याने आतापर्यंत केवळ 1 विजय नोंदवला आहे. बंगळुरूने 6 सामने खेळले आहेत, ज्यात फक्त 1 सामना जिंकला आहे.
संबंधित बातम्या:
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसारखी दिसणारी ही मिस्ट्री गर्ल कोण?; पाहा Photo's
दिल्लीचा विजय अन् 4 संघांचा क्रम बदलला;चेन्नईला सामना न खेळता फायदा झाला, पाहा IPL Points Table
आयपीएलमध्ये पदार्पण केलं अन् मैदान गाजवलं; 21 वर्षांच्या पठ्ठ्यानं डिव्हिलियर्सचाही मोडलाय विक्रम