आयपीएलमध्ये पदार्पण केलं अन् मैदान गाजवलं; 21 वर्षांच्या पठ्ठ्यानं डिव्हिलियर्सचाही मोडलाय विक्रम
DC vs LSG IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 6 गडी राखून पराभव केला.
DC vs LSG IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) 6 गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सने घरच्या मैदानावर खेळताना 167 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही कारण डेव्हिड वॉर्नर केवळ 8 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर पृथ्वी शॉने जबाबदारी स्वीकारली, पण मागील सामन्याप्रमाणे त्याला अर्धशतकही करता आले नाही. वॉर्नर 22 चेंडूत 32 धावा करून माघारी परतला.
दिल्लीने सुरुवातीच्या षटकांत अतिशय संथ फलंदाजी केली, मात्र त्यानंतर ऋषभ पंत आणि आयपीएलमध्ये पदार्पण करणारा जेक फ्रेझर मॅकगर्कने स्फोटक शैलीत फलंदाजी करत लखनौच्या गोलंदाजांना धुळ चारली. एकीकडे पंतने 24 चेंडूत 41 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. तर मॅकगर्कने 35 चेंडूत 55 धावा केल्या. त्याने 2 चौकार आणि 5 षटकारही मारले. मॅकगर्कच्या या खेळीची चर्चा आता होऊ लागली आहे.
Maiden IPL FIFTY for Jake Fraser-McGurk on DEBUT!
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2024
Hat-trick of sixes in this thoroughly entertaining knock 💥💥💥
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #LSGvDC pic.twitter.com/0hXuBkiBr3
कोण आहे जेक फ्रेझर मॅकगर्क?
जेक फ्रेझर मॅकगर्क त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. या 21 वर्षीय फलंदाजाने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये शतक झळकावत दक्षिण अफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला होता. जेक फ्रेझर मॅकगर्क या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने अवघ्या 29 चेंडूत शतक झळकावून क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित केले. त्याने आपल्या झंझावाती खेळीत 13 षटकार ठोकले. यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्सने 18 जानेवारी 2015 रोजी 31 चेंडूत शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता.
मॅकगर्क दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळतो-
जेक फ्रेझर मॅकगर्क देशांतर्गत क्रिकेटमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळतो.दिल्ली कॅपिटल्सने वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीच्या जागी जेक फ्रेझर मॅकगर्कचा आपल्या संघात समावेश केला आहे. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी जखमी झाला होता, त्यानंतर त्याला आयपीएलमधून बाहेर व्हावे लागले होते. दिल्ली कॅपिटल्सने जेक फ्रेझर मॅकगर्कला 50 लाखांच्या किमतीत सामील केले. ऑस्ट्रेलियाकडून 2 वनडे खेळलेल्या जेक फ्रेजर मॅकगर्कच्या नावावर 51 धावा आहेत. पण हा फलंदाज टी-20 फॉरमॅटमध्ये झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो.
युवा खेळाडूंचे सामन्यावर वर्चस्व-
लखनौ आणि दिल्लीतील या सामन्यात युवा खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. तत्पूर्वी, लखनौने अवघ्या 74 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या, मात्र त्यानंतर आयुष बडोनीने 35 चेंडूत 55 धावा केल्या आणि अर्शद खाननेही 16 चेंडूत 20 धावा करत लखनौला 167 धावांपर्यंत नेले. दरम्यान, अर्शद खाननेही गोलंदाजीने प्रभावित केले. दुसरीकडे, दिल्लीकडून जेक फ्रेझर मॅकगर्कने पदार्पणाच्याच सामन्यात 55 धावांची शानदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
संबंधित बातम्या:
रोहित शर्मासोबत मस्ती करताना दिसला विराट कोहली; मैदानात नेमकं काय घडलं?, पाहा Video