(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MI vs KKR : बुम बुम बुमराहाचा पॉवर 'पंच', कोलकात्याला 165 धावांत रोखले
IPL 2022 Marathi News : जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे कोलकाता संघाने निर्धारित 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 165 धावांपर्यंत मजल मारली.
MI vs KKR, IPL 2022 : जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे कोलकात्याच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे कोलकाता संघाने निर्धारित 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 165 धावांपर्यंत मजल मारली. बुमराहने पाच विकेट घेत कोलकात्याचे कंबरडे मोडले. मुंबईला विजयासाठी 166 धावांचे आव्हान दिलेय.
राणा-वेंकटेशची दमदार फलंदाजी -
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून कोलकात्याला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कोलकात्याकडून अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर यांनी दमदार सलामी दिली. 5.4 षटकांत त्यांनी 60 धावांची सलामी दिली. वेंकटेश अय्यर 43 धावा काढून माघारी परतला. चार षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने अय्यरने 43 धावा चोपल्या. अय्यरनं अजिंक्य रहाणेही लगेच माघारी परतला. रहणेने 25 धावा काढळ्या. नीतीश राणानेही 43 धावांची खेळी केली. अय्यर, रसेल, शेल्ड जॅक्सन, पॅट कमिन्स आणि सुनिल नारायण यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. यांना दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही. कर्णधार अय्यर सहा तर रसेल 9 धावा काढून बाद झाला. रिंकू सिंहने अखेरच्या षटकात फटकेबादी करत कोलकात्याचा डाव 160 पार नेला. सुनील नारायण, पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्ती यांना खातेही उघडता आले नाही.
बुमराहचा भेदक मारा -
मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. बुमराहने चार षटकात फक्त 10 धावा देत पाच विकेट घेतल्या. बुमराहने एक षटक निर्धाव टाकले. तर अखरच्या षटकात फक्त एक धाव दिली. बुमराहशिवाय कुमार कार्तिकेय याने दोन विकेट घेतल्या. तर डॅनिअल सॅम्स आणि एम अश्विन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
कोलकात्याच्या संघात पाच बदल -
मुंबईच्या फलंदाजीचा कणा असणारा सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलला मुकणार आहे. सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत रमणदीप सिंहला संधी देण्यात आली आहे. तर कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेकीचा कौल गमावला. कोलकात्याच्या संघात तब्बल पाच बदल करण्यात आले आहे. अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, शेल्डॉन जॅक्सन, पॅट कमिन्स आणि वरुण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आले आहे.
कोलकात्याची प्लेईंग 11 -
वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शेल्डन जॅक्सन, पॅट कमिन्स, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती
मुंबईची प्लेईंग 11 -
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), रमणदीप सिंह, तिलक वर्मा, कायरण पोलार्ड, टीम डेविड, डॅनिअल सॅम्स, एम. अश्विन, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, रायली मेरिडेथ