एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL Final : धोनीच्या सुपरकिंग्जसमोर सनरायझर्सचं आव्हान
केन विल्यमसनची सनरायझर्स हैदराबाद आणि महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आयपीएलची फायनल रंगणार आहे.
मुंबई : मुंबईचं वानखेडे स्टेडियम आयपीएलच्या 'आखरी जंग'साठी सज्ज झालं आहे. याच वानखेडे स्टेडियममधून सात एप्रिलला आयपीएलच्या अकराव्या मोसमाचा रथ निघाला होता. चेन्नई सुपर किंग्सनं मुंबई इंडियन्सला हरवून नव्या मोसमाची विजयी सलामी दिली होती. चेन्नईच्या त्याच फौजेनं मग वानखेडे स्टेडियमच्याच साक्षीनं फायनलमध्ये धडक मारली. आता आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरायचं तर चेन्नईसमोर आव्हान आहे ते सनरायझर्स हैदराबादचं.
कोण होणार आयपीएलच्या अकराव्या मोसमाचा चॅम्पियन... केन विल्यमसनची सनरायझर्स हैदराबाद की महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्स? दक्षिणेच्या याच दोन फौजांमध्ये आज संध्याकाळी सात वाजता आयपीएलची फायनल रंगणार आहे.
ऑरेंज आणि यलो आर्मीमधल्या या लढाईच्या निमित्तानं सारं वानखेडे स्टेडियम भगव्या आणि पिवळ्या रंगात जणू न्हाऊन निघणार आहे.
आयपीएलच्या यंदाच्या महायुद्धात हैदराबाद आणि चेन्नईच्या फौजा आमनेसामने येण्याची ही चौथी वेळ आहे. हैदराबाद आणि चेन्नई संघांमध्ये साखळीत दोन लढाया झाल्या आहेत. तिसरी लढाई होती ती क्वालिफायर वनची. लढाई कोणतीही असो... चेन्नईनं हैदराबादवर तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. ट्वेन्टी ट्वेन्टीच्या मैदानात सामन्याच्या दिवशी सर्वोत्तम खेळ करणारा संघ हा जिंकत असतो. त्यामुळे हैदराबादच्या विजयाची आशा मावळलेली नाही.
सनरायझर्स हैदराबादनं 2016 साली डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर विल्यमसनच्या नेतृत्वाखाली हैदराबादनं पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सची तर आयपीएल फायनलमध्ये खेळण्याची ही तब्बल सातवी वेळ आहे. धोनीच्या चेन्नईनं 2010 आणि 2011 साली आयपीएल विजेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं. पण 2008, 2012, 2013 आणि 2015 सालच्या आयपीएलमध्ये चेन्नईला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.
हैदराबादनं यंदाच्या आयपीएल मोसमात खरोखरच कमाल केली. नवी संघबांधणी आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नरवर आलेली बंदी या आव्हानांशी जुळवून घेऊन हैदराबादनं साखळीत सर्वोत्तम कामगिरी बजावली. आयपीएलच्या गुणतालिकेत पहिला नंबर मिळवून त्यांनी फायनलचं तिकीट मिळवलं.
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसननं यंदाच्या मोसमात 16 सामन्यांमध्ये आठ अर्धशतकांसह 688 धावांचा रतीब घातला, तोही 143.33 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटनं. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजासाठी दिली जाणारी ऑरेंज कॅप सध्या त्याच्याच डोक्यावर आहे. सलामीच्या शिखर धवननंही 15 सामन्यांत 139.34 च्या स्ट्राईक रेटनं 471 धावा फटकावल्या आहेत. हैदराबादच्या मनीष पांडे, युसूफ पठाण, शकिब अल हसन यांनीही दोनशेहून अधिक धावांचं योगदान दिलं आहे.
हैदराबादचं धारदार आक्रमण हे त्यांचं बलस्थान आहे. हैदराबादच्या गोलंदाजांनी यंदाच्या मोसमात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. लेग स्पिनर रशिद खाननं चार षटकांत अवघ्या 19 धावा मोजून कोलकात्याच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं आणि क्वालिफायर टू सामन्याला कलाटणी दिली. त्याआधी साखळी सामन्यांमध्ये तर हाताशी माफक धावांचं संरक्षण असतानाही हैदराबादला गोलंदाजांनी सामने जिंकून दिले आहेत. विशेष म्हणजे त्या काळात भुवनेश्वर कुमारसारखं वेगवान अस्त्र दुखापतीनं बेजार होतं. तरीही हैदराबादनं माफक धावांचं संरक्षण घेऊन मुंबई, पंजाब आणि बंगलोरला धूळ चारली.
हैदराबादकडून रशिद खान आणि सिद्धार्थ कौलनं 16 सामन्यांत सर्वाधिक 21 फलंदाजांना माघारी धाडलंय. याशिवाय शकिब अल हसननं 16 सामन्यांत 14, संदीप शर्मानंही 11 सामन्यांत 11 आणि भुवनेश्वर कुमारनं 11 सामन्यांत 9 विकेट्स घेतल्या आहेत.
चेन्नईच्या धोनी ब्रिगेडनंही यंदाच्या मोसमात आपला चांगलाच दबदबा राखला. चेन्नई संघात कर्णधार धोनीसह अंबाती रायुडू, सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, फॅफ ड्यू प्लेसी आणि हरभजन सिंग हे सात शिलेदार तिशीपलीकडचे आहेत. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचं डॅडीज आर्मी असं नव्यानं बारसं झालं आहे. तिशीपल्याडच्या याच शिलेदारांनी चेन्नईला पुनरागमनात फायनलचं तिकीट मिळवून दिलं.
चेन्नईच्या अंबाती रायुडूने 15 सामन्यांमध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांसह 586 धावांचा रतीब घातला आहे. धोनी, वॉटसन आणि रैना या तिघांनीही चारशेचा उंबरठा ओलांडला आहे. त्यामुळे फलंदाजीत चेन्नईची फौज तुलनेत भारी दिसते. चेन्नईचं आक्रमणही हैदराबादच्या तोडीस तोड आहे. शार्दूल ठाकूरनं 12 सामन्यांमध्ये 15 आणि ड्वेन ब्राव्होनं 15 सामन्यांमध्ये 13 फलंदाजांना माघारी धाडलं आहे. लुन्गी एनगिडी, रवींद्र जाडेजा आणि दीपक चहार या तिघांच्या खात्यात प्रत्येकी 10 विकेट्स आहेत. हरभजनसिंगनं सात आणि शेन वॉटसननं सहा विकेट्स घेऊन चेन्नईच्या संमिश्र आक्रमणाची धार दाखवून दिली आहे.
फॅफ ड्यू प्लेसीनं क्वालिफायर वन सामन्यात बजावलेल्या एकहाती कामगिरीनं चेन्नईला नवा मॅचविनर मिळवून दिला आहे. ट्वेन्टी ट्वेन्टीच्या लढाईचं हेच तर वैशिष्ट्य असतं. इथे एकांडा शिलेदारही आपल्या फौजेला विजयाचं बळ पुरवू शकतो. त्यामुळे चेन्नईचं आव्हान लय भारी असलं तरी हैदराबादमध्येही ऐनवेळी चमत्कार घडवण्याची ताकद आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
Advertisement