आधी अभ्यास करा, मग प्रश्न विचारा; न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर विराटने पत्रकाराला झापलं
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा सात विकेट्सने पराभव झाला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीला स्थानिक पत्रकारने त्याला केन विलियमसन आणि ओपनर टॉम लॅथम बाद झाल्यानंतर केलेल्या आक्रमक सेलिब्रेशनबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नावर विराट भडकल्याचं दिसून आलं.
ख्राईस्टचर्च : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहे. एखादं सेलिब्रेशन करतानाही तो आक्रमक झालेलं अनेकदा दिसलंय. मात्र विराट कोहलीला त्याच्या याच आक्रमकतेबाबत विचारलेल्या प्रश्नावरही तो भडकला. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहली निशाण्यावर आहे. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. एका स्थानिक पत्रकाराने विराटला केन विलियमसनला बाद केल्यानंतर आक्रमकपणे सेलिब्रेशन केल्याबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नावर विराट भडकला आणि आणि संपूर्ण माहिती घेऊन या, मग प्रश्न विचारण्याचा सल्ला दिला.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन आणि ओपनर टॉम लॅथम बाद झाल्यानंतर विराटने आक्रमकपणे सेलिब्रेशन केलं. कोहलीच्या याच सेलिब्रेशनबद्दल एका स्थानिक पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला. या प्रश्नावर विराट कोहलीला राग आल्याचं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. यावर बोलताना विराटने म्हटलं की, "तुम्हाला काय वाटतं? मी उत्तर मागत आहे. तुम्हाला उत्तर शोधण्याची गरज आहे आणि चांगले प्रश्न घेऊन या. मैदानात जे झालं याबाबतची तुमची माहिती अपूर्ण आहे. त्यामुळे अर्धवट प्रश्न घेऊन तुम्ही नाही येऊ शकत. तुम्हाला वाद निर्माण करायचा असेल, तर हे योग्य ठिकाण नाही."
IND Vs NZ | न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील लाजिरवाण्या पराभवावर विराट कोहली म्हणतो..
Indian captain #ViratKohli was not impressed with the line of questioning and he let it be known#NZvIND #TeamIndia pic.twitter.com/XNlD3zhspq
— Cricbuzz (@cricbuzz) March 2, 2020
Ind vs NZ, 2nd Test Day 3 | न्यूझीलंडचा भारताला क्लीनस्वीप, टीम इंडियाचा 7 विकेट्सनी पराभव
पुढे विराटने म्हटलं की, माझं याबाबत मॅच रेफरीसोबत बोलण झालं आहे. मॅच रेफरी रंजन मदुगले यांना याबाबत काहीही तक्रार नाही. केन विलियमसनला याबाबत विचारलं असता, "विराटचा तो स्वभाव आहे. मला नाही वाटत याबाबत जास्त विचार करण्याची आवश्यकता आहे. विराट मैदानात नेहमीच आक्रमकपणे खेळतो."
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाबाबत भारताकडून कोणतंही कारण दिलं जाणार नाही. फलंदाजांची दोन्ही कसोटीतील कामगिरी निराशाजनक आहे. दोन्ही कसोटीत गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, मात्र फलंदाजांची त्यांना साथ नाही मिळाली. भारतीय फलंदाजांनी वारंवार त्याच चुका केल्या. या चुकांमुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी दबाव कायम ठेवला, असं विराट कोहलीने म्हटलं.
ख्राईस्टचर्चच्या हेग्ले ओवर मैदानात खेळवण्यात आलेला हा सामना अवघ्या तिसऱ्या दिवशीच संपला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर 132 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. किवी संघाने हे लक्ष्य सात विकेट्स राखून पार केलं. यात सलामीवीर टॉम लॅथम (52 धावा) आणि टॉम ब्लण्डेल (55 धावा) यांनी महत्त्वपूर्व योगदान दिलं. याआधी यजमान संघाने भारताला पहिल्या कसोटी सामन्यात दहा विकेट्सनी पराभूत केलं होतं. अशाप्रकारे कसोटी अव्वल क्रमांकावर असलेल्या भारताला न्यूझीलंडने मायदेशात 2-0 असं पराभूत केलं. या दौऱ्यातील ट्वेन्टी 20 मालिका भारताने 5-0 अशी जिंकली होती. मात्र त्यानंतर वनडे सामन्यात मात्र 0-3 असा व्हाईटवॉश स्वीकारावा लागला. आता कसोटी मालिकेतही भारताचा 0-2 असा लाजिरवाणा पराभव झाला.
इतर बातम्या