एक्स्प्लोर
द. आफ्रिकेकडून टीम इंडियाचा पाच विकेट्सनी धुव्वा
टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेतल्या पहिल्या वन डे मालिकाविजयासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेनं जोहान्सबर्गच्या चौथ्या वन डेत टीम इंडियाचा पाच विकेट्स राखून धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेनं हा सामना जिंकून सहा सामन्यांच्या मालिकेत भारताची आघाडी 1-3 अशी कमी केली. त्यामुळे टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेतल्या पहिल्या वन डे मालिकाविजयासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
जोहान्सबर्गच्या वन डेत भारतानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 290 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानं दक्षिण आफ्रिकेला 28 षटकांत 202 धावांचं आव्हान मिळालं.
डेव्हिड मिलर आणि हेन्री क्लासेननं पाचव्या विकेटसाठी रचलेल्या 72 धावांच्या भागिदारीनं दक्षिण आफ्रिकेला विजयपथावर नेलं. मग क्लासेन आणि फेलुकवायोनं सहाव्या विकेटसाठी 33 धावांची अभेद्य भागीदारी रचून दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
याआधी, टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने जोहान्सबर्गच्या चौथ्या वन डेत कारकीर्दीतलं तेरावं शतक साजरं केलं. धवनच्या या शतकामुळे टीम इंडियाने 50 षटकांमध्ये 7 बाद 289 धावांची मजल मारली. महेंद्रसिंह धोनीच्या नाबाद 42 धावांच्या खेळीने भारताला ही मजल मारता आली.
धवनच्या कारकीर्दीतला हा 100 वा वन डे सामना होता. शंभराव्या वन डे सामन्यात शतक ठोकणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. धवनने 9 चौकार आणि एका षटकारासह शतकाला गवसणी घातली. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधला हा सामना जोहान्सबर्गच्या न्यू वॉन्डरर्स स्टेडियमवर रंगला.
या सामन्यात सलामीचा रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर धवन आणि कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी 158 धावांची भागीदारी रचून भारताचा डाव सावरला. विराटने 83 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकारासह 75 धावांचं योगदान दिलं.
खराब प्रकाशामुळे सामना 35 व्या षटकात थांबवण्यात आला. पुन्हा सामना सुरु झाल्यानंतर शिखर धवन 109 धावांवर बाद झाला. मात्र महेंद्रसिंह धोनीने केलेल्या नाबाद 42 धावांच्या खेळीने भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर मोठं आव्हान उभं करता आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement