बटलरचं झुंजार अर्धशतक, इंग्लंड आठ बाद 260 धावा
जोस बटलरच्या झुंजार अर्धशतकामुळे इंग्लंडनं साऊदम्प्टन कसोटीच्या दुसऱ्या डावात आठ बाद 260 धावांची मजल मारली आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडच्या हाताशी 233 धावांची मजबूत आघाडी आहे.
साऊदम्प्टन : जोस बटलरच्या झुंजार अर्धशतकामुळे इंग्लंडने साऊदम्प्टन कसोटीच्या दुसऱ्या डावात आठ बाद 260 धावांची मजल मारली आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडच्या हाताशी 233 धावांची मजबूत आघाडी आहे. सॅम करन सध्या नाबाद 36 धावांवर खेळत आहे.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी उपाहारानंतर इंग्लंडची चार बाद 92 अशी अवस्था केली होती. मात्र त्यानंतर बटलरने संघाची सूत्रं आपल्या हातात घेत इंग्लंडचा डाव सावरला. त्याने सात चौकारांसह 69 धावांचं योगदान दिलं.
बटलरने बेन स्टोक्सच्या साथीने 56 धावांची तर सॅम करनच्या साथीने 55 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. भारताकडून मोहम्मद शमीने तीन फलंदाजांना माघारी धाडलं, तर ईशांत शर्माने दोन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमरा आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
काल पहिल्या डावात भारताने चेतेश्वर पुजाराच्या शतकी खेळीच्या जोरावर 27 धावांची आघाडी मिळवली होती. भारताचा पहिला डाव 273 धावांत आटोपला. पुजाराने 257 चेंडूंत 16 चौकारांसह नाबाद 132 धावांची खेळी रचून भारताच्या पहिल्या डावाची भक्कम उभारणी केली. त्याचं कसोटी कारकीर्दीतलं हे 15वं शतक ठरलं. पुजाराने कोहलीच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी रचली.