एक्स्प्लोर
कोलंबो कसोटीत लोकेश राहुलचं पुनरागमन निश्चित
पहिल्या कसोटीत तापामुळे खेळू न शकलेला सलामीचा लोकेश राहुल दुसऱ्या कसोटीसाठी तंदुरुस्त झाला आहे.
गॉल कसोटीत श्रीलंकेचा 304 धावांनी धुव्वा उडवणारी टीम इंडिया मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यातल्या दुसऱ्या कसोटीला आजपासून कोलंबोच्या एसएससी मैदानावर सुरुवात होत आहे. टीम इंडियानं गॉल कसोटीवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं असलं तरी कोलंबो कसोटीसाठी भारतीय संघात एक बदल नक्की होणार आहे.
पहिल्या कसोटीत तापामुळे खेळू न शकलेला सलामीचा लोकेश राहुल दुसऱ्या कसोटीसाठी तंदुरुस्त झाला आहे. त्यात राहुल हा भारताचा सलामीचा प्रमुख फलंदाज असल्यानं दुसऱ्या कसोटीसाठी त्याचं भारतीय संघातलं पुनरागमन निश्चित आहे, असं कर्णधार विराट कोहलीनं सांगितलं. पण राहुलला संघात घेण्यासाठी शिखर धवन आणि अभिनव मुकुंद यांच्यापैकी एकाला विश्रांती द्यावी लागेल. विराटनं आपणकुणाला विश्रांती देणार हे मात्र स्पष्ट केलेलं नाही. पण ज्येष्ठता आणि ताजी कामगिरी लक्षात घेता धवन दुसऱ्या कसोटीत खेळेल आणि मुकुंदला विश्रांती देण्यात येईल असा जाणकारांचा अंदाज आहे. शिखर धवननं पहिल्या डावात 190 धावांची आक्रमक खेळी करून सामनावीराचा बहुमान पटकावला होता.
पहिल्या कसोटीत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारतानं सरस कामगिरी बजावली होती. शिखर धवन, चेतेश्वर पुजारा यांनी पहिल्या डावात शतकं ठोकली, मग दुसऱ्या डावात कर्णधार विराट कोहलीनंही नाबाद शतक साजरं करून यजमानांसमोर विजयासाठी 550 धावांचं कठीण आव्हान उभं केलं होतं. या कसोटीत भारतीय आक्रमणासमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी दोन्ही डावात लोटांगण घातलं. टीम इंडियानं या विजयासह 2015 सालच्या गॉल कसोटीतल्या लाजिरवाण्या पराभवाचा वचपा काढला. भारताचा हा सर्वाधिक धावांच्या फरकानं परदेशात मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरला होता.
गॉल कसोटीतील त्या यशाच्या पार्श्वभूमीवर कोलंबोच्या दुसऱ्या कसोटीत मैदानात उतरताना भारतीय संघाचं मनोबल नक्कीच उंचावलेलंअसेल. दुखापतींनी ग्रासलेल्या श्रीलंकन संघात कर्णधार दिनेश चंडिमलचं पुनरागमन ही जमेची बाजू आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज रंगाना हेराथच्या खेळण्याविषयी अजूनही साशंकता आहे. मध्यमगती गोलंदाज सुरंगा लकमलला पाठीच्या दुखण्यामुळं कोलंबो कसोटीवरही पाणी सोडावं लागलंय. अष्टपैलू असेला गुणरत्ने पहिल्या कसोटीतच जायबंदी झाल्यानं लंकेची मधली फळी कमकुवत झाली आहे. त्यामुळे श्रीलंकेची भिस्त आता प्रामुख्यानं सलामीवीर दिमुथ करूणारत्ने, कुशल मेंडिस, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, दिलरूवान परेरा यांच्यावरच असेल. असेला गुणरत्नेच्या जागी संघात वर्णी लागलेल्या लाहिरू थिरीमनेकडूनही श्रीलंकेला चांगल्या खेळाची अपेक्षा राहील.
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारत सध्या पहिल्या स्थानावर आहे तर श्रीलंका सातव्या स्थानावर आहे. त्यामुळं कोलंबो कसोटीतही भारताचं पारडं जड दिसतं आहे. कोलंबोतल्या सिंहलीज स्पोर्टस क्लबच्या मैदानावर याआधी भारत आणि श्रीलंका संघांत आठ कसोटी सामने झाले आहेत. त्यापैकी चार लढती ड्रॉ झाल्यात तर दोन्ही संघांनी दोन दोन कसोटी जिंकल्या आहेत. 2015 सालच्या कोलंबो कसोटीत भारतानं श्रीलंकेवर 117 धावांनी मात केली होती. आता या दौऱ्यातही कोलंबो कसोटी जिंकून तीन कसोटी सामन्यांची मालिका खिशात घालण्याचा विराट आणि त्याच्या शिलेदारांचा प्रयत्न राहिल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement