Deaflympics 2022 : मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये भारताच्या धनुष श्रीकांतची सुवर्णकामगिरी, तर शौर्य सैनीने जिंकलं कांस्यपदक
Gold in Deaflympics 2022: ब्राझीलच्या कॅसियस दो सूल या शहरात 24 वी मूकबधीर ऑलिम्पिक स्पर्धा पार पडत आहे.
Dhanush Srikanth and Shourya Saini in Deaflympics 2022 : ब्राझीलमध्ये सुरु असलेल्या 24 व्या मूकबधीर ऑलिम्पिक (Deaflympics) स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली आहे. धनुष श्रीकांतने 10 मीटर एअर रायफल शूटींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं असून शौर्य सैनीने कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. मूकबधीर ऑलिम्पिक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी 10 मीटर एअर रायफल शूटिंग स्पर्धेत आठ खेळाडूंमध्ये फायनल सामना खेळवला गेला. यामध्ये भारताच्या धनुषने 247.5 च्या रेकॉर्ड स्कोरसह सुवर्णपदकावर नाव कोरलं. तर दक्षिण कोरियाच्या किम वू याने 246.6 च्या स्कोरसह दुसरं स्थान मिळवलं. याशिवाय तिसरं स्थान मिळवत कांस्य पदकही भारताच्या शौर्य सैनीने 224.3 च्या स्कोरसह मिळवलं.
माजी ऑलिम्पिक पदकवीर नेमबाद गगन नारंग यांनीही धनुष आणि शौर्य यांना त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी एक ट्वीट लिहिलं असून त्यात लिहिलं आहे की, 'जेव्हा पोडियमवर दोन भारतीय झेंडे एकत्र फडकत होते त्याशिवाय दुसरी चांगली फिलिंग काही असूच शकत नाही. धनुष आणि शौर्य यांनी त्यांच्या कामगिरीने संपूर्ण भारताचा गौरव केला आहे. त्यांच्या या कामगिरीला आणि मेहनतीला सलाम.'
बॅडमिंटनमध्येही भारताला सुवर्णपदक
भारताने याच मूकबधीर ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन खेळात देखील सुवर्णपदक मिळवलं. भारतीय संघाने जपानच्या खेळाडूंना फायनलमध्ये 3-1 ने मात देत हे सुवर्णपदक मिळवलं. सध्या भारतीय संघ दोन सुवर्णपदकं आणि एक कांस्य पदकासह मेडल टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहेत. तर यूक्रेन 19 सुवर्ण, 6 रौप्य आणि 13 कांस्य पदकांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे.
हे देखील वाचा-
- RCB vs CSK, Top 10 Key Points : बंगळुरुचा चेन्नईवर 13 धावांनी विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- ICC Rankings: टी-20 मध्ये भारत नंबर वन! कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडिया कितव्या क्रमांकावर?
- IPL 2022 : लिव्हिंगस्टोनचा गुजरातविरुद्ध अफलातून षटकार; राशिदनं जाऊन चक्क लियामची बॅट तपासली, पाहा फोटो