मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अहमदनगर जिल्ह्यात एका एस टी बसच्या सीटखाली प्रवाशाला नोटांचा बंडल आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. 500 रुपयांच्या नोटांचे दोन बंडल सापडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली
अहमदनगर : राज्यातील 288 विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यंदा प्रथमच 66 टक्क्यांपर्यंत मतदान वाढल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे गेल्या 30 वर्षातील हा मतदानाचा सर्वाधिक टक्का असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, आता सर्वांना निकालाचीच उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांची (Election) घोषणा केल्यानंतर राज्यात आदर्श आचरसंहिता लागू करण्यात आली आहे. तेव्हापासून स्थीर पथक आणि भरारी पथकाने पोलिसांच्या मदतीने कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर रोकड व मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. निवडणूक काळात या पैशाचा व वस्तूंचा वापर केला जात होता, याबाबतचा तपासही करण्यात आला. तर, मतदानाच्या आदल्यादिवशीही अनेक मतदारसंघात नोटांचे बंडल पाहायला मिळाले. मतदारांना पैसे वाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, आता चक्क धावत्या एसटी बसमध्ये (Bus) नोटांचा बंडल सापडल्याने खळबळ उडाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात एका एस टी बसच्या सीटखाली प्रवाशाला नोटांचा बंडल आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. 500 रुपयांच्या नोटांचे दोन बंडल सापडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील ही घटना असून एसटी आगार व पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या एका युवकाने मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा जपत बसमधील वाहकाकडे नोटांचे हे दोन्ही बंडल सुपूर्द केले आहेत. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एस.टी बसमध्ये मोठी रक्कम मिळून आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आहे. तसेच, ही रक्कम नेमकी कोणाची आहे, कोणत्या कामासाठी ही रक्कम बसमधून नेण्यात येत होती, याचाही तपास करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे मतदानच्या एक दिवस अगोदर, दोन दिवसांपूर्वी हीच बस स्ट्रॉंग रुमपासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रावर गेली होती. त्यानंतर काल याच बसने कोपरगाव -वैजापूर-कोपरगाव अशा फेऱ्या केल्या आहेत. काल सायंकाळी कोपरगावहून धामोरीकडे जात असताना बसमधील एका विद्यार्थ्याला शेवटच्या सीटखाली नोटांचे दोन बंडल सापडले आहेत. या दोन्ही बंडलमधील नोटांची बेरीज केली असता तब्बल 86 हजारांची रोख रक्कम सापडल्याचे पाहायला मिळत आहे. एव्हढी मोठी रक्कम नेमकी कुणाची आणि बसच्या सीटखाली कशी आली? याबाबत पोलीस तपासात सर्वगोष्टी निष्पन्न होतील. सध्या बसमधील वाहकाकडून ही रक्कम संबंधित तपास यंत्रणेकडे देण्यात आली आहे.
हेही वाचा
Exit Poll: भाजपला फटका बसणार, शिंदेंनाही 'दे धक्का', जागा घटणार; एक्झिट पोलमधून समोर आली आकडेवारी