एक्स्प्लोर
गतविजेती जर्मनी मेक्सिकोकडून सलामीला का हरली?
गतविजेत्या जर्मनीला रशियातल्या फिफा विश्वचषकात सलामीलाच खळबळनजक पराभवाला सामोरं जावं लागलं. फ गटातल्या या सामन्यात मेक्सिकोनं जर्मनीचा १-० असा पराभव केला. मेक्सिकोनं जर्मनीला हरवण्याची आजवरच्या इतिहासातली ही केवळ दुसरी वेळ आहे. जर्मनीवर ही वेळ का आली, जाणून घेऊयात एबीपी माझाच्या रिपोर्टमधून...
मेक्सिकोच्या इरविन्ग लोझानोच्या गोलनं जर्मनीचा पोलादी बचाव भेदून दाखवला. लोझानोच्या त्याच गोलनं गतविजेत्या जर्मनीला सलामीच्या सामन्यात गुडघे टेकायला भाग पाडलं. लोझानोच्या गोलनं गेल्या ३६ वर्षांत जर्मनीवर सलामीच्या सामन्यात पराभवाची वेळ आणली. पण इरविन्ग लोझानोचा तोच गोल आता जर्मनीला गटातून गाशा गुंडाळायला लावणार का?
रशियातल्या विश्वचषकात जर्मनीचा समावेश मेक्सिको, स्वीडन आणि दक्षिण कोरियाचा समावेश असलेल्या फ गटात झाला आहे. जर्मनीला सलामीच्या सामन्यात हार स्वीकारावी लागली असली, तरी स्वीडन आणि दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यांमधली विजयी कामगिरी जर्मन गरुडाच्या पंखात नवं बळ भरू शकते. त्यासाठी जर्मनीला आपल्या कामगिरीत भरीव सुधारणा करावी लागणार आहे. पण जर्मनीची विश्वचषकासाठीची पूर्वतयारी आणि त्यांच्या संघनिवडीवर नजर टाकली तर आपल्याला त्यावर केवळ निराशा आणि वादाचंच प्रतिबिंब पडलेलं पाहायला मिळतं.
फिफा विश्वचषकासाठी रशियात दाखल होण्याआधी, जर्मनीला सहापैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला होता. इंग्लंड, फ्रान्स आणि स्पेननं जर्मनीला बरोबरीत रोखलं होतं, तर ब्राझिल आणि ऑस्ट्रियाकडून जर्मनीला पराभूत व्हावं लागलं होतं. सौदी अरेबियावर मिळवलेला २-१ हा एकमेव विजय जर्मनीच्या खात्यात जमा होता. त्यामुळं सलामीच्या जर्मनीनं मेक्सिकोकडून स्वीकारलेली हार फुटबॉलच्या कट्टर रसिकांना आश्चर्याचा धक्का देणारी नव्हती.
जर्मनीचे प्रशिक्षक योआकिम लूव्ह यांनी २०१४ सालच्या विश्वचषक विजेत्या संघातल्या नऊपैकी आठ शिलेदारांना यंदा पुन्हा संधी दिली होती. मेसूत ओझिलनं गुडघ्याच्या दुखापतीतून सावरून जर्मन संघात पुनरागमन केलं आहे. गोलरक्षक मॅन्युअल नोयाही दीर्घकाळानंतर आपल्या भूमिकेत पुन्हा उभा राहिला. जेरोम बोआटेन्गच्या पूर्वतयारीलाही जांघेतल्या दुखापतीचा फटका बसला होता,
रशियातल्या विश्वचषकात सहभागी झालेला जर्मनीचा संघ हा गतविजेत्यांचा गेल्या सोळा वर्षांमधला सर्वात वयस्कर संघ आहे. त्यामुळं मेक्सिकोच्या वेगासमोर जर्मनीचा वेग भलताच फिका ठरला. मेक्सिकोनं जर्मनीचे प्रतिहल्ले सहज थोपवून धरले. मेक्सिकोच्या चिचॅरितो, इरविन्ग लोझानो आणि कार्लोस वेला यांच्या तुलनेत जर्मनीच्या समी खेदिरा, मेसूत ओझिल आणि जेरोम बोआटेन्ग यांच्या मूव्हज संथ असल्याचं दिसून आलं.
जर्मन संघातल्या उणिवांचा साहजिकच त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला. मेक्सिकोनं नेमका त्याचाच लाभ उठवला आणि रशियातल्या फिफा विश्वचषकात जर्मनीवर सलामीच्या सामन्यात लोटांगण घालण्याची वेळ आली. जर्मनीनं सलामीच्या सामन्यामध्ये झालेल्या चुकांमधून वेळीच बोध घेतला आणि आपल्या कामगिरीत सुधारणा केली, तर गतविजेत्यांना विश्वचषकाची बाद फेरी गाठण्याची अजूनही संधी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement