एक्स्प्लोर
FIFA World Cup 2018 : रशियाकडून सौदी अरेबियाचा 5-0 ने धुव्वा
फिफा विश्वचषकात रशियाने सौदी अरेबियाचा 5-0 ने धुव्वा उडवून विजयी सलामी दिली.

मॉस्को : फिफा विश्वचषकात रशियाने सौदी अरेबियाचा 5-0 ने धुव्वा उडवून विजयी सलामी दिली. विश्वचषकाच्या अ गटातला हा सामना मॉस्कोच्या ल्युझिनिकी स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात रशियाने मध्यंतरालाच 2-0 अशी आघाडी घेऊन सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. युरी गझिन्स्कीनं बाराव्या मिनिटाला हेडरवर गोल करुन रशियाचं खातं उघडलं. त्यानंतर डेनिस चेरीशेव्हनं 43 व्या मिनिटाला रशियाचा दुसरा गोल डागला. उत्तरार्धात आर्तेम झ्युबानं 71 व्या मिनिटाला रशियाच्या तिसऱ्या गोलची नोंद केली. त्यानंतर एन्जुरी टाईममध्ये डेनिस चेरीशेव्ह आणि अलेक्झांडर गोलोविननं रशियाच्या खात्यात आणखी दोन गोलची भर घातली. रशियातल्या एकविसाव्या फिफा विश्वचषकला मॉस्कोतल्या उद्घाटन सोहळ्यानं आज मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. ब्रिटिश पॉपस्टार रॉबी विल्यम्सचा परफॉर्मन्स हे या उद्घाटन सोहळ्याचं वैशिष्ट्य ठरलं. रशियाची नामवंत गायिका आयडा गारिफुलिनाच्या साथीनं रॉबी विल्यम्सनं गीत सादर केलं. त्यावेळी मैदानावर मोठ्या फुटबॉलची प्रतिकृती उभारण्यात आली होती. दोन्ही गायकांच्या अवतीभवती पाचशेहून अधिक नर्तकांनी आपली कला सादर केली. विश्वचषकाचं बोधचिन्ह असलेला झाबिवाका हा लांडगा मैदानात अवतरला. पाठोपाठ ब्राझिलचा माजी फुटबॉलवीर एका चिमुरड्याच्या साथीनं मैदानात उतरला. झाबिवाकानं छोट्या मुलासोबत लुटूपुटूचा फुटबॉल खेळला.
आणखी वाचा























