(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जो रुटने आयपीएलमध्ये खेळू नये, ईसीबीचा सल्ला
रुटने आयपीएलऐवजी विश्वचषक आणि अॅशेस मालिकेवर लक्ष केंद्रीत करावं असा सल्ला ईसीबीने रुटला दिला आहे.
लंडन : इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार जो रुटला आयपीएलमध्ये खेळण्यास इंग्लड क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) मनाई केली आहे. ईसीबीने आगामी विश्वचषक आणि अॅशेस मालिकेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. रुटने आयपीएलऐवजी विश्वचषक आणि अॅशेस मालिकेवर लक्ष केंद्रीत करावं असा सल्ला ईसीबीने रुटला दिला आहे.
रुट सध्या भारताविरुद्धच्या पाच कसोटी मालिकेत इंग्लंडचं नेतृत्व करत आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर रुट सप्टेंबरमध्ये इंग्लंडच्या घरगुती क्रिकेटमध्ये व्यस्त असणार आहे. त्यानंतर इंग्लंडचा संघ ऑक्टोबरमध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.
श्रीलंका दौऱ्यात इंग्लंड पाच एकदिवसीय सामने, एक टी-20 सामना आणि तीन कसोटी सामने खेळणार आहे. एवढा व्यस्त कार्यक्रम लक्षात घेत ईसीबीने रुटला टी-20 लीगमध्ये न खेळण्याचा सल्ला दिला आहे. 2019चा विश्वचषक इंग्लंडमध्ये होत आहे. विश्वचषकानंतर लगेच इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅशेस मालिका खेळणार आहे.
इंग्लंड संघासाठी रुट महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे मोठ्या टुर्नामेंटमध्ये रुटला दुखापती होऊ नये, तसेच न थकता रुट संघासाठी उपलब्ध व्हावा यासाठी रुटला आयपीएल खेळण्यास ईसीबीने मनाई केली आहे.
भारताविरोधात लिमिटेड ओव्हरच्या मालिकांमध्ये रुटची कामगिरी उत्कृष्ट आहे. भारताविरुद्ध रुटने तीन एकदिवसीय सामन्यात दोन शतक ठोकली आहेत.