Rishabh Pant : टीम इंडिया नव्या विकेटकीपरच्या शोधात? श्रीलंका दौऱ्यात ऋषभ पंतचं नाव नसल्यानं चर्चांना उधाण
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादीत षटकांचे सामने रंगणार असून नुकताच बीसीसीआयने यासाठी संघ जाहीर केला आहे. यावेळी टी20 आणि वनडे दोन्हीमध्ये विकेटकीपर म्हणून ईशान किशनला संधी दिली गेली आहे.
IND vs SL : भारतीय क्रिकेट संघ (Team India) 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने (BCCI) यासाठी टीम इंडियाची घोषणा देखील केली आहे. पण या संघात दमदार, स्फोटक फलंदाज ऋषभ पंतला संधी देण्यात आलेली नाही. पंतने अलीकडे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. तो सातत्याने फ्लॉप असल्यानं त्याला विश्रांती देण्यासाठी हा निर्णय बीसीसीयनं घेतला असावा. तसंच या दोन्ही मालिकांमध्ये ईशान किशन (Ishan Kishan) याला संधी दिल्याने बीसीसीआय नव्या विकेटकीपरच्या शोधात असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
भारताच्या बांगलादेश दौऱ्यात पंतला दुखापत झाली होती. यानंतर त्याला संघातून विश्रांती देण्यात आली श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये पंत सातत्याने फ्लॉप ठरला आहे. तो बाहेर पडताच बीसीसीआयने ईशान किशनसह केएल राहुलकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपवली आहे. राहुल श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विकेटकीपिंगही करू शकतो. त्यामुळे बीसीसीआय पंतसह विकेटकीपिंगचे आणखी पर्याय शोधत आहे, अशा चर्चा होताना दिसत आहेत.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऋषभ पंतने 93 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. चितगाव कसोटीतही त्याने एका डावात 46 धावा केल्या होत्या. पण त्याआधी तो वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये सतत फ्लॉप ठरला. मेलबर्नमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पंत 3 धावा करून बाद झाला. यानंतर तो इंग्लंडविरुद्धच्या टी-20मध्ये 6 धावा करून बाद झाला. न्यूझीलंडविरुद्ध 6, 11 आणि 15 धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या सर्वामुळे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याला विश्रांती देण्याच निर्णय बीसीसीआयने घेतला असावा.
श्रीलंकेविरुद्ध कशी आहे टीम इंडिया?
भारताचा टी20 संघ-
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन दिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार
भारताचा एकदिवसीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), ईशान किशन (विकेटकिपर), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह
हे देखील वाचा-