IND vs SA T20 World Cup: वर्ल्डकप जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींचा टीम इंडियाला फोन, रोहित शर्माला म्हणाले...
Team India win World cup: भारतीय संघाने थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघावर विजय मिळवला. पंतप्रधान मोदींनी सुर्यकुमार यादवने घेतलेल्या कॅचचे कौतुक केले.
Narendra Modi reaction India Win T20 World Cup: गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने हुलकावणी देत असलेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदाला भारतीय संघाने शनिवारी बार्बाडोसच्या मैदानात गवसणी घातली. या विजयामुळे ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेतील जेतेपद (T 20 World cup) मिळवण्यासाठीची भारताची 17 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली. भारतीय संघाने (Team India) विश्वचषक जिंकल्यानंतर देशभरात एकच जल्लोष झाला. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी थेट बार्बाडोसला फोन फिरवून भारतीय संघाचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण भारतीय संघाशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी मोदींनी रोहित शर्माला कर्णधारपदाची जबाबदारी उत्तमप्रकारे सांभाळल्याबद्दल शाबासकी दिली. तर विराट कोहलीने अंतिम सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना केलेल्या 76 धावांच्या खेळीचे कौतुक केले. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. काल विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ट्वेन्टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती.
मोदींकडून सूर्याकुमार यादवच्या अफलातून कॅचचे कौतुक
नरेंद्र मोदी यांनी सूर्यकुमार यादवने मोक्याच्या क्षणी आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरचा सीमारेषेवर अफलातून झेल पकडला होता. इथेच या सामन्याला कलाटणी मिळाली होती. पंतप्रधान मोदी यांनी सूर्यकुमार यादवच्या या कॅचचे कौतुक केले. याशिवाय, मोदींनी जसप्रीत बुमराहच्या कामगिरीचीही तारीफ केली.
भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विटवर एक व्हीडिओही पोस्ट केला होता. त्यामध्ये मोदींनी म्हटले होते की, आपल्या संघाने दिमाखदार अंदाज ट्वेन्टी-20 विश्वचषक जिंकला आहे. आम्हाला भारतीय संघाच्या या कामगिरीचा गर्व आहे. भारतीय संघाने देशातील प्रत्येक गावगल्लीतील लोकांची मनं जिंकली आहेत. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना हारला नाही, ही उल्लेखनीय गोष्ट असल्याचे मोदींनी म्हटले होते.
अंतिम सामन्यात भारताचा थरारक विजय
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर 177 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता. अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला 16 धावांची गरज होती. मात्र, मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्याने टिच्चून गोलंदाजी केल्याने टीम इंडियाचा 7 धावांनी विजय झाला होता.
आणखी वाचा